मुंबई - अगोदरच इराकमधील पेचप्रसंगामुळे चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना लांबलेल्या पावसामुळे आर्थिक सुधारणांना धक्का बसण्याची शक्यता वाटत आहे. बाजारातील मरगळीच्या वातावरणात प्रत्येक जण सावध भूमिका घेऊन व्यवहार करीत आहे. त्यातूनच झालेल्या विक्रीच्या मा-यात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांना फटका बसून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरले आणि दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली.
भांडवली निधीचा ओघ मंदावल्याचाही बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी 96.29 अंकांनी घसरून 25,105.51 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 29.25 अंकांनी घसरून 7511.45 अंकांच्या पातळीवर स्थिरावला. तीन दिवसांत सेन्सेक्स 415.68 अंकांनी घसरला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याचा सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या समभागांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याशिवाय विदेशी निधी संस्थांची आटलेली खरेदी, लांबलेला मान्सून या सगळ्या गोष्टी बाजारासाठी नकारात्मक ठरत असल्याचे मत ब्रोकर्सनी व्यक्त केले. कमी पावसामुळे वाहन विक्रीवर परिणाम होण्याच्या भीतीने महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प आणि अन्य वाहन कंपन्यांच्या समभागांना फटका बसला. जवळपास आठवडाभर बाजारात नरमाईचेच वातावरण कायम राहिले.
टॉप लुझर्स
महिंद्रा अॅँड महिंद्रा, टाटा पॉवर, हिंदाल्को इंडस्ट्रीज, सन फार्मा, सेसा स्टरलाइट, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, भेल.
टॉप गेनर्स
अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, टीसीएस