आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आयपीओ'ला उभारी कंपन्या गोळा करणार आठ हजार कोटी रुपयांचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेजाळलेल्या शेअर बाजारामुळे प्राथमिक समभाग बाजारपेठेलाही (आयपीओ) नवी उभारी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात गुंतवणूकदारांना विविध कंपन्यांकडून आयपीओची भेट मिळणार आहे. व्यवसाय विस्‍तार तसेच कामकाज भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास आठ हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ येणाऱ्या काही महिन्यांत बाजारात धडकतील, अशी अपेक्षा आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत या कंपन्या भांडवल बाजाराचा उंबरठा ओलांडण्याची शक्यता आहे.

सध्या सात कंपन्यांनी २, ९६५ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार केला असून त्यांच्या आयपीओला बाजार नियंत्रक सेबीकडून मान्यता मिळाली आहे. त्याशिवाय आणखी १२ कंपन्यांनी भांडवल बाजार नियंत्रकांकडून प्राथमिक समभाग विक्रीचा मसुदा सादर केला आहे. या कंपन्या जवळपास ५३६२ कोटी रुपयांचा निधीउभारण्याच्या विचारात असून त्याला बाजार नियंत्रकांकडून मंजुरी मिळणे अद्याप बाकी असल्याचे प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हाल्दिया यांनी सांगितले.

मे महिन्यात केंद्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर बाजाराला चालना मिळाली असून जवळपास बारा कंपन्यांनी सार्वजनिक समभाग विक्रीसाठी बाजार नियंत्रकांकडे मसुदा दाखल केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीओ बाजारात हालचाली दिसून येतील, अशी अपेक्षा जिओजत बीएनपी परिबासचे संशोधन प्रमुख अॅलेक्स मॅथ्यू यांनी व्यक्त केली. अगोदर भांडवल बाजारातील खराब वातावणामुळे अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आता त्या कंपन्या पुन्हा भांडवल बाजारात प्रवेश करण्याची तयारी करीत असल्याचेही ते म्हणाले. ‘ई-आयपीओ’मुळे देखील प्राथमिक समभाग बाजारपेठेला नवी चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
‘एसएमई आयपीओ’ची मागणी वाढणार
२०१३ मध्ये ३५ लघु आणि मध्यम उद्योगातील (एसएमई) कंपन्यांच्या ३५ एसएमई आयपीओंनी ३३५ कोटी रुपयांचा निधीउभारला. त्याउलट नुकत्याच संपलेल्या वर्षात ४० एसएमई आयपीओमधून २६७ कोटी रुपयांचे निधीसंकलन झाले. त्यामुळे यंदाही एसएमई आयपीओची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.