आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरत्या सेन्सेक्सला घटत्या महागाईचा मिळाला आधार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एस अँड पी जागतिक पतमानांकन संस्थेने युरोझोनमधील 9 देशांचे पतमानांकन घटवल्यामुळे जागतिक शेअर बाजारात आलेली नरमाई लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करणे पसंत केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात विक्रीचा मारा झाला. परंतु महागाई दराने दोन वर्षांचा नीचांक गाठल्याने बाजारात पुन्हा खरेदीचा माहोल तयार झाला. परिणामी सकाळच्या सत्रातील तोटा भरून काढत सेन्सेक्सने 35 अंकांची वाढ नोंदवत 16,189.36 अंकांची गेल्या पाच आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. या तिळाएवढ्या तेजीने बाजारातील गोडी मात्र वाढली.
आंतरराष्टÑीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सेन्सेक्सचा पारा सकाळच्या सत्रात 117 अंकांनी खाली उतरला होता. परंतु चलनवाढ कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. परिणामी बाजारात जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्सने 16,189.36 अंकांची गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्सने 34.74 अकांची वाढ नोंदवली. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 7.90 अंकांची वाढ होऊन तो 4873.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. खरेदीच्या झंझावातामध्ये भांडवली वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान समभागांना चांगली मागणी आली. परंतु रिफायनरी समभागांना, विशेषकरून रिलायन्सच्या समभागांना विक्रीचा फटका बसला. रिलायन्सच्या समभाग किमतीत सर्वाधिक 2.55 टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर एचडीएफसी बॅँक, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओएनजीसी, एनटीपीसी यांच्या समभागांची घसरगुंडी झाली. परंतु एल अ‍ॅँड टी, आयटीसी, टीसीएस, स्टेट बॅँक, टाटा मोटर्स, भेल, भारती एअरटेल यांच्या समभाग खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
महागाईचा दिलासा
डिसेंबरअखेर संपलेल्या कालावधीमध्ये मुख्य महागाई दोन वर्षांचा नीचांक गाठत 7.47 टक्क्यांवर आल्यामुळे बाजाराला मोठा दिलासा मिळाला. रिझर्व्ह बॅँक 24 तारखेच्या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता आता बाजाराला वाटू लागली आहे.
आशियाई शेअर बाजारात घसरण
आशियाई देशांमध्ये चीन, हॉँगकॉँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तैवान येथील शेअर बाजार घसरले. परंतु दुपारच्या सत्रात युरोपातील प्रमुख शेअर बाजारांत संमिश्र कल दिसून आला.
उलाढाल घटली
बाजारात उलाढाल मात्र लक्षणीय घसरून ती गेल्या शुक्रवारच्या 2,742.45 कोटी रुपयांवरून 2,092.59 कोटी रुपयांवर आली.

तरीही गुंतवणूकदार सावध
अन्नधान्याचा महागाई दर आणि आता मुख्य महागाईचा दरही घटला आहे. त्यामुळे शिखर बॅँक व्याजदरात कपात करण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असल्या तरी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. कारण बाजारातील काही विश्लेषकांनी रिझर्व्ह बॅँक नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदर किंवा रोख राखीव प्रमाण कमी करणे अशी कोणतीही भूमिका घेऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे.

टॉप गेनर्स
भेल, मारुती सुझुकी, एल अ‍ॅँड टी, स्टर्लाइट, स्टेट बॅँक, टाटा मोटर्स, टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल, विप्रो, टाटा पॉवर, टाटा स्टील, आयटीसी.

टॉप लुझर्स
एटीपीसी, एचडीएफसी बॅँक, डीएलएफ, सन फार्मा, सिप्ला, ओएनजीसी, एचडीएफसी.