आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Sensex Down 42 Points, Divyamarathi

पाच सत्रांनंतर बाजारात घसरण; सेन्सेक्स 42 अंकांनी गडगडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या पाच सत्रांत चांगली वाढ झाल्यानंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजाराला झटका बसला. दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, बँका आणि धातू समभागांवर विक्रीचा ताण येऊन सेन्सेक्स 42 अंकांनी घसरला.
स्पेक्ट्रम लिलावामध्ये दूरसंचार कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची भीती बाजाराला वाटत आहे. त्याचा फटका दूरसंचार समभागांना बसला. दोन दिवसांच्या राष्ट्रव्यापी बँक संपामुळे बँक समभाग आपटले. न्या. एम.बी. शहा आयोगाने 2008-2011 या कालावधीत ओडिशामधील खाणीत 60 हजार कोटी रुपये मूल्याचे बेकायदा खाणकाम झाल्याचा अहवाल सोमवारी संसदेला सादर केला. त्याचा नकारात्मक परिणाम धातू समभागांवर झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 20,429.16 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. जागतिक शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्सने नंतर 20,434.50 अंकांची आणखी कमाल पातळी गाठली. परंतु नव्याने सुरू झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 20,312.21 अंकांच्या पातळीवर घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स 42.29 अंकांनी घसरून 20,334.27 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्समध्ये 167.30 अंकांची वाढ झाली होती.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 9.75 अंकांनी घसरून 6053.45 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
मरगळीचे संकेत देणार्‍या आगाऊ आर्थिक विकासदराच्या अंदाजामुळे बाजारात अस्वस्थता निर्माण झाली.