आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Sensex Hike Maruti Bajaj Tata Still

तेजीचा गोडवा कायम, रुपया झाला बळकट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी शेअर बाजारातील स्थिर वातावरण आणि येणाºया काही महिन्यांत आर्थिक विकास वेगाने होण्याचे मिळालेले संकेत यामुळे बाजारात खरेदीची धूम उडाली. भांडवली वस्तू, धातू, स्थावर मालमत्ता, रिफायनरी समभागांना चांगली मागणी आल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने 277 अंकांची उंच उडी मारत 16,466.05 अंकांची गेल्या पाच आठवड्यांतील उच्चांकी पातळी नोंदवली.
औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ, महागाईमध्ये झालेली लक्षणीय घट, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची निर्माण झालेली आशा या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे बाजारातील खरेदीचा उत्साह वाढला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या दोन सत्रांत 152 अंकांनी वधारल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच खरेदीचा माहोल होता. त्यामुळे दिवसभरात उसळी घेत सेन्सेक्स दिवसअखेर 276.69 अंकांनी वाढून 16,466.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. या अगोदर 8 डिसेंबरला सेन्सेक्सने ही पातळी गाठली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेही 93.40 अंकांची वाढ साधत 4,900 अंकांची पातळी ओलांडली. निफ्टी दिवसअखेर 4967.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
माँटेकसिंग यांनी दिला बाजाराला दिलासा
चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर 7 टक्के राहील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला, परंतु नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी 2012 -13 वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश विकासदर 8 टक्क्यांवर नेण्याचा असेल, असे स्पष्ट केल्यामुळेही बाजाराला मोठा दिलासा मिळाला.
विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा सपाटा
विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी बाजारात खरेदीचा सपाटा सुरू ठेवला आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एफआयआयने 357.68 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. एफआयआयच्या खेरदीमुळे बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे समभाग चमकले
मारुती सुझुकी, हिंदाल्को, एल. अँड टी., टाटा स्टील, एनटीपीसी, कोल इंडिया, स्टर्लाइट, हिंदुस्थान लिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, डीएलएफ, जिंदाल स्टील, ओएनजीसी, बजाज ऑटो, सन फार्मा, टाटा मोटर्स, विप्रो, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला.

रुपया झाला बळकट
डॉलरच्या तुलनेत रुपयाने गेल्या दोन महिन्यांचा उच्चांक गाठत 50.73 रुपये अशी नोंद केली. रुपयाला मिळालेल्या या बळकटीमुळे आयात खर्च कमी होऊन भारतीय कंपन्यांच्या नफ्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकेल, अशी नवी आशा गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. जागतिक शेअर बाजारांमध्ये चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान शेअर बाजार वधारले. दुपारच्या सत्रात युरोप शेअर बाजारातही चांगली वाढ झाल्याने त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.

क्षेत्रीय निर्देशांक वधारले
3.73 %
भांडवली वस्तू
3.66 %
धातू
3.46 %
स्थावर मालमत्ता
2.79 %
तेल आणि वायू
2.62 %
वाहन