आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 23 हजारांकडे... सेन्सेक्स, निफ्टी या दोन्ही निर्देशांकांचा उच्चंकाचा विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक वाढीच्या मिळत असलेल्या सकारात्मक संकेतांमुळे बँका, तेल आणि औषध कंपन्यांच्या तुफान झालेल्या समभाग खरेदीत सेन्सेक्सने आपले अगोदरचे सर्व विक्रम मोडून काढले. खरेदीच्या पाठिंब्यावर सेन्सेक्सने 358 अंकांची उसळी घेत 23 हजार अंकांच्या नव्या सर्वोच्च शिखराकडे वाटचाल करताना कामकाजाच्या मधल्या सत्रात 22,740.04 अंकांचा आतापर्यंतचा नवा विक्रम नोंदवला.
संपूर्ण दिवसभरात बाजारात असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 358.89 अंकांची दणदणीत कमाई करीत 22,702.34 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेही पहिल्यांदाच इंट्रा-डे व्यवहारात 6,800 अंकांची नवी विक्रमी पातळी मोडून काढली. निफ्टी दिवसअखेर 101.15 अंकांनी वाढून 6796.20 अंकांच्या विक्रमी पातळीवरच बंद झाला.
आंतरराष्टÑीय नाणेनिधी संघाने भारताच्या आर्थिक विकासदरात सुधारणा होऊन तो 4.4 टक्क्यांवरून (2013) 5.4 टक्क्यांवर (2014) जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वाढीच्या सुखद अंदाजानंतर सेन्सेक्सने एकाच दिवसात घेतलेली मोठी झेप आहे. त्याअगोदर सात मार्चला सेन्सेक्सने अशीच एकाच
दिवसात मोठी कमाई केली होती. युरोप शेअर बाजारातील तेजीचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
या समभागांनी केली कमाई
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बॅँक, स्टेट बॅँक ऑफ इंडिया, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, हिंदाल्को, भेल, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी
सन फार्माचे शेअर्स फॉर्मात
सन फार्मा या कंपनीने रॅनबॅक्सी लॅबोरेटीज ही कंपनी ताब्यात घेण्याचे जाहीर केले आहे. या खरेदीनंतर सनफार्मा ही सर्वात मोठी औषध कंपनी होणार आहे. त्यामुळे सन फार्माच्या समभागांना मागणी येऊन त्यांची किंमत 6.60 टक्क्यांनी वाढली.
क्षेत्रीय निर्देशांकाची कमाई
बँक 14,798.80 3.45%
धातू 10,363.34 2.26%
आरोग्य 10,593.26 2.21%
रिअ‍ॅल्टी 1,533.57 1.85%
आयटी समभागांना झटका
इन्फोसिस आणि टीसीएस या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक निकाल जवळ आले असल्याने त्याअगोदर झालेल्या विक्रीचा फटका माहिती तंत्रज्ञान समभागांना बसला. इन्फोसिसच्या समभाग किमतीत 1.16 टक्क्यांनी घट झाली.
पुढे काय ? : निवडणूकपूर्व तेजी
बुधवारी बाजारात आलेली तेजी निवडणुकीपूर्वीची आहे. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेऊन स्वत:च्या पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करत नफा हाती ठेवावा. किरकोळ गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीनुसार गुंतवणूक करावी. प्रत्येक राजकीय वृत्तावर बारकाईने लक्ष ठेवावे, कोणत्याही वृत्तावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता गुंतवणूक करावी. विश्वनाथ बोदाडे, गुंतवणूक सल्लागार
रुपया घसरून 60.14 वर
बुधवारी सकाळच्या फॉर्मात असणार्‍या रुपयाने दुपारच्या सत्रात सर्व कमाई गमावली. डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी घसरून 60.14 वर स्थिरावला. सत्राच्या अखेरीस आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीचा फटका रुपयाला बसल्याचे फॉरेक्स डीलर्सनी सांगितले.