आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स वधारला; 102.32 अंकांची उसळी, नव्या विक्रमी पातळीवर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बुधवारच्या अचानक धक्क्यानंतर शेअर बाजारात पुन्हा सुधारणा झाली. औद्योगिक उत्पादन आणि महागाईच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असले तरी ते जाहीर होण्याच्या अगोदर बँक समभागांना, विशेषकरून एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक समभागांची तुफान खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स 102.32 अंकांची उसळी घेत पुन्हा एका नव्या विक्रमी पातळीवर गेला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कमाल पातळीवर उघडला आणि त्यानंतर तो जवळपास 200 अंकांनी वाढला होता. बाजारातील तेजी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 102.32 अंकांनी वाढून 25,576.21 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्सने 109.80 अंकांनी आपटी खाल्ली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील 23.05 अंकांनी वाढीची नोंद केली आणि तो 7649.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

एप्रिल महिन्यातील औद्योगिक उत्पादन तसेच ग्राहक किमतीवर आधारित महागाईची आकडेवारी गुरुवारी बाजाराचे कामकाज झाल्यानंतर जाहीर होणार आहे; परंतु या आकडेवारीत काही तरी चांगली सुधारणा होऊन पुढील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करू शकेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले. बाजारात झालेल्या खरेदीमध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन समभागांवर गुंतवणूकदारांच्या जास्त उड्या पडल्या.

टॉप गेनर्स
हिंदाल्को, सन फार्मा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टीसीएस, टाटा मोटर्स, सिप्ला.

टॉप लुझर्स
भारती एअरटेल. कोल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, भेल.