आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीने तेजीला भरारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या सगळीकडे थंडीचे बोचरे वारे वाहत असले तरी जगभरातील शेअर बाजारांमधील स्थिर वातावरण, घटलेली महागाई आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने येत असलेला निधीचा ओघ यामुळे भांडवल बाजारात मात्र खरेदीचे सुखद वारे वाहू लागले आहे. भांडवल बाजारातील सध्याच्या या आल्हाददायक वातावरणामध्ये स्थावर मालमत्ता, धातू, ऊर्जा आणि बॅँक समभागांची तुफान खरेदी होऊन सेन्सेक्सने 192 अंकांची झेप घेत 16,643.74 अंकांची गेल्या सहा आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली.
मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सचा पारा सकाळपासूनच चढला तो खाली उतरलाच नाही. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स 192.27 अंकांनी वधारून 16,643.74 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकाने देखील 7 डिसेंबरनंतर पहिल्यांदाच पाच हजार अंकांची पातळी ओलांडली. निफ्टीमध्ये दिवसअखेर 62.60 अंकांची वाढ होऊन तो
5018.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सर्वांची नजर रिझर्व्ह बँकेकडे
चलनवाढ गेल्या तीन आठवड्यांपासून सलग नकारात्मक पातळीवर राहिल्यामुळे आता रिझर्व्ह बॅँक 24 जानेवारीला नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची आशा बाजाराला वाटू लागली आहे. बोनान्झा पोर्टफोलिओच्या संशोधक विश्लेषक शानू गोएल यांनीही शिखर बँक आपल्या नाणेनिधी धोरणामध्ये व्याजदराबाबत मृदू धोरण स्वीकारेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
जागतिक शेअर बाजारांत तेजी
चीन, हॉँगकॉँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया बाजारपेठेत तेजी होती. त्याचप्रमाणे युरोप शेअर बाजारातही दुपारच्या सत्रानंतर स्थिरता आली. आशियाई आणि युरोप बाजारातील वातावरणाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
‘एफआयआय’ आक्रमक
विदेशी गुंतवणूकदार संपूर्ण सप्ताहामध्ये सातत्याने समभाग खरेदी करीत आहेत. गेल्या 13 सत्रांमध्ये त्यांनी सलग खरेदी केली आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ‘एफआयआय’ने 961.30 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. बाजारातील एकूण उलाढाली वाढून 2,509.13 कोटी रुपयांवर गेली.

अनिल अंबानी समूहातील कंपन्या तेजीत
बाजारात झालेल्या खरेदीचा जास्त फायदा झाला तो अनिल अंबानी समूहातील कंपन्यांना. रिलायन्स कॅपिटल, आरपॉवर, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स मीडिया या सर्व कंपन्यांच्या समभागांना दणकून मागणी आली.

हे समभाग चमकले
स्टर्लाइट, टाटा पॉवर, आयसीआयसीआय, कोल इंडिया लि., मारुती सुझुकी, सन फार्मा, टाटा स्टील, एल. अँड टी., हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, जिंदाल स्टील, ओएनजीसी, गेल इंडिया, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड.