आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीला बुक्का, तेजीचा डंका ; सेन्सेक्समध्ये 285 अंकांची वाढ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या चार सत्रांपासून घसरणीच्या मंदीचा प्रभाव असणा-या बाजारात मंगळवारी तेजीचा डंका वाजला. घसरलेल्या किमतीत ब्ल्यूचिप कंपन्यांच्या समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारात तेजी आली. त्यातच विदेशी संस्थांनी खरेदीचा सपाटा लावल्याने तेजीला अधिक धार आली. उत्साही वातावरणात सेन्सेक्सने सोमवारी झालेला तोटा काही अंशी भरून काढत 285 अंकांची झेप घेत 17,731 अंकांची पातळी गाठली.
काही सत्रांपासून सपाटून मार खाणा-या रिअ‍ॅल्टी, भांडवली वस्तू, बँकिंग, पॉवर, मेटल आणि आॅटो या क्षेत्रीय निर्देशांकात चांगली वाढ झाली. कर्जाच्या खाईतून ग्रीसला बाहेर काढण्यासाठी देण्यात येणा-या बेलआऊट पॅकेजचा मार्ग निर्वेध होण्याची चिन्हे असल्यामुळे जगातील प्रमुख शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. आशियातील शेअर बाजारात मोठी तेजी होती. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीतील वाढीला अधिक हातभार लागला. राष्ट्रीय श्ोअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 94.30 अंकांच्या वाढीसह 5735.50 या पातळीवर बंद झाला. विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) जोरदार खरेदी केली. एफआयआयनी बाजारातून 329.09 कोटींच्या समभागांची खरेदी केल्याचे सेबीने म्हटले आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 समभाग तेजीत राहिले. मुबंई शेअर बाजारातील एकूण समभागांपैकी 2139 समभाग ग्रीन झोनमध्ये बंद झाले, तर 765 समभाग रेड झोनमध्ये बंद झाले. बुधवारी जाहीर होणा-या जीडीपीच्या आकडेवारीकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे

बाजाराचे लक्ष जीडीपीकडे
जगातील प्रमुख शेअर बाजारांतील उत्साही वातावरण आणि सकारात्मक कल यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. युरोपातील बाजाराच्या तेजीने झालेल्या सुरुवातीने बाजाराला वाढीची दिशा दाखवली. बुधवारी जाहीर होणा-या जीडीपीच्या आकडेवारीकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे.’’
शानू गोयल, रिसर्च अनालिस्ट, बोनान्झा पोर्टफोलिओ

तेजीचे शिलेदार
हिंदाल्को, एसबीआय, टाटा मोटर्स, डीएलएफ, स्टर्लाइट, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय, टाटा पॉवर, कोल इंडिया, जिंदाल स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती आणि ओएनजीसी.