आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची घोडदौड सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वादग्रस्त ठरलेल्या ‘गार’ नियमांची अंमलबजावणी लांबणीवर पडल्यामुळे आनंदित झालेल्या भांडवल बाजाराच्या आनंदात डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त झाल्याने आणखी भर पडली. याच आनंदात रिफायनरी, स्थावर मालमत्ता आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची तुफान खरेदी होऊन सेन्सेक्सने 243 अंकांची उसळी घेत तब्बल दोन वर्षांनंतर 20 हजार अंकांचे शिखर सर केले.

महागाई तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे 29 तारखेला जाहीर होणार्‍या पतधोरणात रिझर्व्ह बॅँक व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा आणि विदेशी निधी संस्थांकडून सातत्याने होत असलेली गुंतवणूक यामुळेदेखील बाजाराला संजीवनी मिळाली. त्यातच अर्थमंत्र्यांनी गुंतवणुकीचे चक्र गतिमान ठेवण्यास जास्त प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितल्यामुळे बाजाराला आणखी मोठा दिलासा मिळाला.

करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘गार’च्या नियमावलीची अंमलबजावणी एप्रिल 2016 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने 243 अंकांवर झेप घेतली. डिसेंबरमध्ये महागाईत झालेली घसरणही बाजारासाठी आनंदवार्ता ठरली. सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स 19,689.09 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर उघडला, पण अल्पावधीतच सेन्सेक्सने 20 हजारांचे शिखर ओलांडत 20,126.55 अंकांची नवी पातळी गाठली.

एफआयआय फिदा
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) या आठवड्यात 4977.79 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यामुळेदेखील बाजारात उत्साह येण्याचे मुख्य कारण आहे. बहुसंख्य कंपन्यांनी तिसर्‍या तिमाहीत केलेली चमकदार आर्थिक कामगिरी आणि सीडीएमए कंपन्या वापरत असलेल्या स्पेक्ट्रमच्या राखीव किमती सरकारने अध्र्या टक्क्याने कमी केल्यामुळेदेखील बाजाराला चालना मिळाली.