आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीचा पाऊस, सेन्सेक्सचे त्रिशतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रुपयाच्या घसरणीने रोखलेला शेअर बाजाराच्या तेजीचा रथ गुरुवारी चौखूर उधळला. तेजीच्या पावसात निर्देशांकाने 324 अशी त्रिशतकी कमाई करत 18,875.95 हा आठवड्याचा उच्चांक गाठला. निफ्टीचे शतक थोडक्यात हुकले. निफ्टी 93.65 अंकांच्या कमाईसह 5682.35 वर स्थिरावला. रुपयातील सुधारणा आणि चालू खात्यातील कमी झालेली तूट यामुळे तेजीला बळ आले. रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस या दिग्गज समभागांनी जोरदार फलंदाजी करत तेजी वाढवली.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही प्रमाणात सुधारणा झाल्याने सकाळपासूनच बाजारात तेजीचे वारे होते. आघाडीच्या तसेच इंडेक्स आधारित समभागांची जोरदार खरेदी झाली. सेन्सेक्सच्या
यादीतील 30 पैकी 20 समभागांत तेजी दिसून आली. यात ओएनजीसीच्या समभागांनी 4.14 टक्के तेजीसह आघाडी मिळवली. रिलायन्स इंडस्ट्रीज 3.48 टक्के, तर इन्फोसिसचे समभाग 3.31 टक्क्यांनी वधारले.

गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 1 लाख कोटींची भर

गुरुवारी आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत एक लाख कोटींची भर पडली. गेल्या काही दिवसांत बाजारातील वातावरण अस्थिर बनले आहे. त्याचा फटका काही वेळा गुंतवणूकदाराला बसला आहे. गुरुवारच्या तेजीने गमावले ते कमावले, अशी स्थिती झाली.

ठोस संकेत हवेत
निर्देशांकाला गती मिळण्यासाठी बाजाराला ठोस सकारात्मक संकेतांची गरज आहे. विदेशी गुंतवणूकदार निधी उपसत असताना हे संकेत आवश्यक ठरतात. निधी सारस्वत, वरिष्ठ विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलिओ.

तेजीचे मानकरी
ओएनजीसी, टीसीएस, एचडीएफसी बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टरलाइट इंडस्ट्रीज, बजाज आॅटो आणि एचडीएफसी, महिंद्रा अँड महिंद्रा.

रुपयात सुधारणा
डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपयात सुधारणा झाली. आंतरबँक मुद्रा विनिमय बाजारात रुपया 53 पैशांच्या कमाईसह 60.19 पातळीवर स्थिरावला. बुधवारी रुपया 60.72 पर्यंत घसरला होता.

सोने झळाळले
आंतरराष्टÑीय बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोने झळाळले. नवी दिल्ली सराफ्यात सोने तोळ्यामागे 120 रुपयांनी वाढून 26,800 झाले. चांदी 40,500 रुपये स्थिर राहिली.