आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या सुधारणांना गती मिळण्याची बाजाराला आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार रखडलेल्या सुधारणांना गती देणार याची मनोमन खात्री बाजाराला पटली आहे. त्यातूनच बाजारात खरेदीचा सपाटा सुरू आहे. निवडणूक निकालानंतर बाजारात आलेल्या तेजीच्या वातावरणामध्ये जोरदार झालेल्या खरेदीत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नुकत्याच संपलेल्या आठवड्यात दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. त्यामुळे सलग तिसर्‍या सत्रात सेन्सेक्सने वाढ कायम ठेवली.
भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे येणार्‍या काळात रचनात्मक सुधारणा घडून येण्याबरोबरच गुंतवणुकीचे वातावरणदेखील सुधारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच गोल्डमन साक्सने आर्थिक वर्ष 2016 मध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढून तो 6.5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंदात आणखी भर पडली. त्यामुळे स्थावर मालमत्ता, ऊर्जा, सार्वजनिक कंपन्या, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आणि तेल कंपन्यांच्या समभागांना सातत्याने मागणी कायम आहे.

खरेदीच्या पाठबळावर सेन्सेक्स 23,340.32 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. त्यानंतर तो 24,275.86 आणि 24,107.99 अंकाच्या श्रेणीत राहिला. दिवसअखेर सेन्सेक्स 571.61 अंकांची उसळी घेत 24,693.35 अंकांच्या साप्ताहिक पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 164.10 अंकांनी वाढून 7,367.10 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या निव्वळ नफ्यामध्ये चौथ्या तिमाहीत घट झाली असली तरी मत्ता दर्जात सुधारणा झाल्यामुळे या समभागांना चांगली मागणी आली. परंतु त्याच्याच जोडीला नवे भाजप सरकार पवन तसेच सौर ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने एनटीपीसी आणि टाटा पॉवर या कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली. केंद्रात स्थिर सरकार येऊन आर्थिक समस्यांचे निराकरण होऊ शकेल, असे मत मुडीज या पतमानांकन संस्थेने व्यक्त केल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना मोठा हुरूप मिळाला आहे.

आठवड्याचे मानकरी
टॉप गेनर्स : एसएसएलटी, एनटीपीसी, भेल, टाटा पॉवर, मारुती सुझुकी, टाटा स्टील, हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बॅँक, लार्सन अ‍ॅँड टुब्रो, ओएनजीसी, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ओएनजीसी, एचडीएफसी.

क्षेत्रीय निर्देशांकांची झेप : स्थावर मालमत्ता : 23.13 %, ऊर्जा : 17.29 %, धातू : 13.11 %, ग्राहकोपयोगी वस्तू : 10.12 %, भांडवली वस्तू : 9.59 %, तेल आणि वायू : 4.90 %, बॅँक : 3.11 %, वाहन : 2.46 %

टॉप लुझर्स : आयटीसी, सन फार्मा, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅब