आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकाची आठवड्याची सुरूवात घसरणीने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या आठवड्यापासून मरगळलेल्या बाजाराला आता जाहीर होणा-या औद्योगिक उत्पादन आणि महागाईच्या आकडेवारीची चिंता लागली आहे. त्यामुळे त्याअगोदरच गुंतवणूकदारांनी काही बड्या समभागांची नफारूपी विक्री केल्यामुळे आठवड्याचा प्रारंभ घसरणीनेच झाला.

आर्थिक विकासदर आणखी घटण्याचा अंदाजामुळे गेल्या आठवड्यापासूनच बाजारात विक्रीचे दडपण कायम आहे. त्यातून नवीन वर्षाच्या सुट्यांमुळे हाँगकाँग, चीन, तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, मलेशिया शेअर बाजार बंद होते. राष्‍ट्रीय स्थापना दिनानिमित्त जपान शेअर बाजारालादेखील सुटी होती. त्यामुळे बाजाराची अवस्था काहीशी दिशा हरवल्यासारखी झाली होती. मंगळवार आणि बुधवार या दोन्ही लागोपाठच्या दिवशी औद्योगिक उत्पादन आणि महागाईची आकडेवारी जाहीर होणार असल्यानेदेखील गुंतवणूकदारांच्या कपाळावरील चिंतेच्या आठ्या वाढल्या आहे. या सगळ्या गोष्टींचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

या नकारात्मक वातावरणामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 24.20 अंकांनी घसरून 19,460.57 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स आतापर्यंत 544 अंकांनी घसरला असून मे 2011 नंतर आठ दिवसांची ही सर्वात दीर्घ घसरगुंडी आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 5,900 अंकांच्या खाली जाऊन 5897.85 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

रिअ‍ॅल्टी, फार्मा आणि सार्वजनिक उपक्रमांचे समभाग वधारल्यामुळे बाजाराला मिळालेला काहीसा आधार हा भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, बहुराष्‍ट्री य कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे तुटून पडला. देशातील मोटारींच्या वार्षिक विक्री दशकभरात पहिल्यांदाच नकारात्मक स्तरावर आल्यामुळे मारुती आणि अन्य मोटार कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा तडाखा बसला.

टॉप लुझर्स
मारुती सुझुकी, ओएनजीसी, जिंदाल स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी, एल अँड टी.
टॉप गेनर्स
सिप्ला, डॉ. रेड्डी लॅब, हिंदाल्को, स्टरलाइट, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स.