आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल, ग्रीसच्या धक्क्यातून सावरेना बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंगळवारच्या दणक्याचा दुसऱ्या दिवशी बाजारावर परिणाम झाला. भांडवल बाजारातून निधी बाहेर जात असल्यामुळे बाजारात विंतेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही विक्रीचा मारा झाल्यामुळे आयसीआयसीआय बँक, आयटीसी, हिंदाल्‍को या बड्या समभागांना फटका बसून सेन्सेक्समध्ये आणखी ७९ अंकांची घसरण झाली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफटीचा निर्देशांक २५.२५ अंकांनी घसरून १७ डिसेंबरनंतर पहिल्यांदाच ८१०२.१० अंकांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी १,५७० कोटी रुपयांच्या समभागांची मंगळवारी विक्री केल्यामुळे बाजारात नरमाईचे वातावरण कायम राहिले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७८.६४ अंकांनी घसरून २६,९०८.८२ अंकांच्या पातळीवर गेला. दिवसभरात सेन्सेक्स २६,७७६.१२ आणि २७,०५१.६० अंकांच्या पातळीत झुलत होता. एकीकडे प्रतिबॅरल ५० डॉलरपर्यंत घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे चिंता वाढलेल्या असतानाच युरोझोनमधून ग्रीस बाहेर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जगभरातील बाजारांनी आणखी धसका घेतला. त्यामुळे मंगळवारी जगभरातील शेअर बाजार धाडकन कोसळले. त्याचा परिणाम होऊन सेन्सेक्सही आपटला. गेल्या साडेपाच वर्षांत सेन्सेक्सची ही सर्वात वाईट घसरगुंडी होती. पुढची दिशा काय हेच कळेनासे झाले असून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी किती घसरण होणार या विंतेमुळे दुसऱ्या दिवशी जगभरातील शेअर बाजारांमध्ये चढ-उतार कायम राहिल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओचे सहनिधी व्यवस्थापक हिरेन धकान यांनी व्यक्त केले. बुधवारी सलग तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स ९८० अंकांनी गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफटीचा निर्देशांक ८,१०० अंकाच्या पातळीवरून घसरून ८०६५.४५ अंकांच्या नीचांकी पातळीवर आला. त्यानंतर तो २५.२५ अंकांनी घसरून ८१०२.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

निफटीच्या घसरगुंडीमुळे आयसीआयसीआय बँक, टीसीएस, गेल, भेल यांच्या समभागांना मोठा फटका बसला. परंतु या पडझडीतही हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, एनटीपीसी या समभागांना चांगली मागणी आली.