आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उत्पादन 104 लाख टनांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील साखरेच्या उत्पादनामध्ये 15 जानेवारीपर्यंत 19 टक्क्यांनी वाढ होऊन ते 104.5 लाख टनांवर गेले असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये दिली आहे.
बाजारातील उसाचा पुरवठा वाढण्याव्यतिरिक्त उसाचे गाळप करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षातील 498 साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा 15 जानेवारीपर्यंत 516 साखर कारखान्यांनी गाळप केले आहे.
महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हटले आहे.
महाराष्ट्रात यंदा उसाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता असली तरी ऊस लागवडीखालील क्षेत्रफळात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी उत्पादन भरून निघेल आणि राज्यातील साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीसारखेच जास्त होण्याची अपेक्षा इस्माने व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत 347 लाख टन उसाचे गाळप झाले असून गेल्या वर्षात ते 271 लाख टन झाले होते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार लवकर गाळपाला सुरुवात केली. परिणामी उत्तर प्रदेशातील ऊस गाळपाचे प्रमाण वाढले आहे; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाची आवक मात्र डिसेंबरपर्यंत 17 टक्क्यांनी कमी झाली.