आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभरात 88 अंकांची घसरण,सलग सातव्या दिवशी सेन्सेक्सची घसरगुंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महागाईला आवर घालण्यासाठी व्याजदरात पुन्हा वाढ होण्याची भीती, त्याच्याच जोडीला अमेरिकेतील अर्थसाहाय्य कार्यक्रम आवरता घेण्याबाबत फेडरल रिझर्व्हने पुन्हा नव्याने सुरू केलेली चर्चा या सगळ्या नकारात्मक घडामोडींचा बाजारावर परिणाम झाला. बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स सलग सातव्या सत्रात 88 अंकांनी घसरला.
सेन्सेक्स निर्देशांक 87.51 अंकांनी घसरून 20,194.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सात सलग सत्रांत सेन्सेक्स 1044.96 अंकांनी घसरला आहे. आठ ऑक्टोबरनंतरची ही सर्वात नीचांकाची पातळी आहे. बाजारात झालेल्या चढ - उतारांच्या व्यवहारात सेन्सेक्सने दिवसभरात 20,365.59 अंकांची कमाल आणि 20,161.64 अंकांची नीचांकी पातळी गाठली होती. आयटीसी, एचडीएफसी बँक, टीसीएस, रिलायन्स, एल अँड टी या बड्या समभागांमुळे सेन्सेक्सला मोठा धक्का बसला. गेल, सिप्ला आणि सेसा स्टर्लाइट या समभागांना सर्वात मोठा झटका बसला.
राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 28.45 अंकांनी घसरून सहा हजार अंकांच्या पातळी खाली जात 5989.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. औद्योगिक उत्पादनाची कूर्मगतीने वाढ दोन अंकी पातळीवरच कायम असलेली किरकोळ महागाई आणि पुढील महिन्यात रेपो दर वाढवण्याची शक्यता या सगळ्या गोष्टींचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे बाजारातील विश्लेषकांनी मत व्यक्त केले.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आर्थिक मदत कार्यक्रम पुढील महिन्यात आवरता घेण्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमात्मक वातावरणामुळे आशियाई आणि युरोप शेअर बाजारातील नरमाई आली. त्याच्याच जोडीला रुपयाही डॉलरसमोर 21 पैशांनी घसरून 63.5 च्या पातळीवर आला. या दोन्ही गोष्टींमुळे बाजाराचा मूड साफ गेला.
स्टेट बँकेच्या तिमाहीत अपेक्षेप्रमाणेच 33 टक्के घट झाल्यानंतर स्टेट बँकेच्या समभाग किमतीत 1.34 टक्क्यांनी वाढ झाली; परंतु त्याच्याच जोडीला टाटा मोटर्स, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा आणि भेल या समभागांनादेखील खरेदीचे पाठबळ मिळाले.
मंगळवारी भांडवल बाजाराचे कामकाज संपल्यानंतर औद्योगिक उत्पादनवाढीची आकडेवारी जाहीर झाली. विशेषकरून व्याजदर संवेदनशील समभागांना विक्रीचा जास्त फटका बसला. रिअ‍ॅल्टी, बहुराष्‍ट्रीय, बँका आणि माहिती तंत्रज्ञान समभाग विक्रीच्या मा-यात आपटले.