आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीचे हुडहुड वादळ, शेअर बाजारात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदराबाबत दिलासा दिल्यानंतर तेजीचे त्रिशतक ठोकल्याच्या दुस-याच सत्रात शुक्रवारी शेअर बाजाराला घसरणीरूपी हुडहुड वादळाने तडाखा दिला. या तडाख्याने सेन्सेक्स ३३९.९० अंकांनी गडगडून २६,२९७.३८ वर आला. गेल्या दोन आठवड्यांतील ही एका सत्रातील सर्वात मोठी पडझड आहे. निफ्टीलाही याचा फटका बसला. निफ्टी १००.६० अंकांनी कोसळून ७८५९.९५ वर स्थिरावला. गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेण्यासाठी विक्रीचा धडाका लावला, त्यातच जगातील प्रमुख बाजारांतही फारसे उत्साहजनक वातावरण नसल्याचा फटका शेअर बाजाराला बसला. आघाडीच्या दिग्गज समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २३ समभाग कोसळले. टाटा मोटर्स, हिंदाल्को, सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा या समभागांत मोठी घसरण झाली. आयटी क्षेत्रातील समभाग मात्र खरेदीमुळे चमकले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुढील वर्षाच्या मध्यानंतर व्याजदरात वाढीचे संकेत दिल्यानंतर बाजारात नफेखोरीला उधाण आले. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी २०.८९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. आशियातील प्रमुख शेअर बाजारात घसरणीचे वातावरण दिसून आले. युरोपातील बाजारांतही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.

घसरणीची कारणे
* अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे पुढील वर्षाच्या मध्यानंतर व्याजदरात वाढीचे संकेत.
* युरोझोनमधील आर्थिक परिस्थिती हाताळणा-या केंद्रीय बँकेसमोर अनेक अडथळे येण्याची शक्यता.
* विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री.
* भारतीय गुंतवणूकदारांनी सतर्क पवित्रा घेतच केलेली नफेखोरी.

टॉप लुझर्स : टाटा मोटर्स, हिंदाल्को, सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा

स्मॉल, मिड कॅपला फटका
बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांना नफेखोरीचा फटका बसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे मिड कॅप इंडेक्स १.३८ टक्क्याने, तर स्मॉल कॅप इंडेक्स १.१२ टक्क्याने घसरले.