आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाई दरात घाऊक घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजीपाला, फळांच्या किमती घसरल्याने नोव्हेंबरमधील किरकोळ महागाईत घाऊक घसरण दिसून आली. वर्षभरापूर्वी दुहेरी आकड्यात असणारा किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये ४.३८ टक्के नोंदवण्यात आला. ऑक्टोबरमध्ये हा दर ५.५२ टक्क्यांवर होता. किरकोळ महागाई दराने जानेवारी २०१२ नंतरचा नीचांक नोंदवल्याने व्याजदर कपातीसाठी हे
पोषक असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील महिन्यात ५.५९ टक्क्यांवर असलेली अन्न-धान्य महागाई आता ३.१४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भाजीपाल्याच्या किमती नोव्हेंबरमध्ये १०.९ टक्क्यांनी घसरल्या, तर फळांच्या किमती १७.४९ टक्क्यांवरून १३.७४ टक्क्यांवर आल्या. ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याच्या किमती १.४५ टक्क्यांनी घसरल्या होत्या. अंडी, मांस आणि मासळी या प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमतीत नोव्हेंबरमध्ये किंचित वाढ दिसून आली. तृणधान्ये व त्याच्या पदार्थांच्या किमतीही ५.२ टक्क्यांनी घटल्या. इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई ३.२७ टक्क्यांनी घटली, तर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती १०.७९ टक्क्यांवरून १०.२४ टक्क्यांवर आल्या.

कर्ज स्वस्ताईला पोषक
किरकोळ महागाई सलग दुस-या महिन्यात घसरण दर्शवली. त्यामुळे आता सर्व नजरा रिझर्व्ह बँकेकडे लागल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने मार्च २०१५ पर्यंत किरकोळ महागाई ८ टक्के, तर जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांच्या पातळीत राखण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. केंद्रीय बँकेच्या अपेक्षेनुसार किरकोळ महागाईने वाटचाल केली तर नजीकच्या काळात प्रमुख
व्याजदरात कपात शक्य असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हंगामी परिणाम
भाजीपाला व फळांच्या किमती घसरल्याने किरकोळ महागाईत घसरण दिसून आली. त्यातच जागतिक बाजारात वस्तूंच्या किमती घसरल्याचाही परिणाम दिसून आला. असे असले तरी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, असे वाटत नाही.
रूपा रेगे-निस्तुरे, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा