आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीचा फायदा: स्मॉल-मिड कॅपने दिला भरभरून परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदा तेजीच्या बैलावर स्वार असलेल्या शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून परताव्याचे माप टाकले आहे. शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकाने सेन्सेक्सवर कडी करत ५६ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) स्मॉल कॅप निर्देशांकाने ५५.८६ टक्के, तर मिड कॅप निर्देशांकाने यंदा ४०.२९ टक्के परतावा आतापर्यंत दिला आहे.

तीस ब्ल्यू चिप कंपन्यांचा समावेश असणा-या सेन्सेक्सने एक एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत २४.११ टक्के परतावा दिला आहे. सोमवारी इंट्रा डे व्यवहारात सेन्सेक्सने २७,९६९ असा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मिड कॅप कंपन्यांच्या निर्देशांकाने १६ सप्टेंबर रोजी १०,०६८.६३ ही विक्रमी पातळी सर केली, तर स्मॉल कॅप निर्देशांकाने त्याच दिवशी ११,३५२.०१ हा ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला.

तज्ज्ञांच्या मते, बाजारात जेव्हा तेजीची लाट असते तेव्हा स्मॉल कॅप कंपन्यांचे समभाग आघाडीच्या समभागांपेक्षा जास्त परतावा देतात, याउलट जेव्हा बाजारात घसरण असते किंवा अस्थैर्य असते, तेव्हा सर्वाधिक फटका स्मॉल कॅप कंपन्यांनाच बसतो.

स्मॉल व मिड कॅप म्हणजे काय?
ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल ब्ल्यू चिप कंपन्यांच्या तुलनेत सरासरी एकपंचमांश असते त्यांना मिड कॅप, तर ज्या कंपन्यांचे भांडवल ब्ल्यू चिप कंपन्यांच्या तुलनेत एकदशांश असते त्यांना स्मॉल कॅप कंपन्या म्हणतात.

परताव्याचा आलेख
स्मॉल कॅप
५५.८६ टक्के
मिड कॅप
४०.२९ टक्के
सेन्सेक्स
२४.११ टक्के
(जानेवारी ते ऑक्टोबर २०१४ काळातील कामगिरी)

एफआयआय बाजारावर फिदा
केंद्रात नवे सरकार आल्याने तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) जोरदार खरेदी केल्याने बाजारात तेजी दिसते आहे. यंदाच्या वर्षाच्या (२०१४) प्रारंभापासून विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात ८२,२६६ कोटी रुपये ओतले आहेत.