आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु उद्योजकांसाठी वित्तीय व्यवस्थापन टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश लघु उद्योजक आपल्या पर्सनल फायनान्सशी निगडित मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे लक्ष व्यवसायातील आर्थिक बाबींकडे असते. व्यवसाय चांगला चालला तर वैयक्तिक जबाबदा-या आपसूकच पूर्ण होतील, या भ्रमात ते असतात. यामुळे व्यवसायातील जोखमीच्या पैलूंकडेही ते चक्क डोळेझाक करतात.


जर तुम्ही लघु उद्योजक असाल आणि व्यवसाय व वैयक्तिक फायनान्सची विभागणी केलेली नसेल तर निश्चितच व्यवसायातील अडचणींमुळे तुमच्या पर्सनल फायनान्सवर परिणाम होईल. तुमची व्यावसायिक उद्दिष्टे अशी असावी की त्यांचा वैयक्तिक उद्दिष्टांसाठीही फायदा होईल. दोन्ही क्षेत्रांत वित्तीय स्थितीचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी खालील बाबींवर लक्ष दिले पाहिजे...
1. व्यवसायासाठी स्वतंत्र आपत्कालीन निधी : व्यवसायात नोकरदारांसारखा ठरावीक पगार नसतो. कधी उत्पन्नापेक्षा अधिक खर्च तर कधी अधिक फायदा. अनेक व्यवसाय कर्ज काढून चालवले जातात. जर तुम्ही रोख रकमेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवले नसेल वा तो वेगळा काढून ठेवलेला नसेल तर प्रसंगी व्यवसायातील खर्चांसाठी वैयक्तिक बचतीतून पैसे काढावे लागू शकतात. अर्थात ही चांगली सवय नव्हे. व्यावसायिक गरजांसाठी तुम्ही किमान सहा महिने पुरेल असा इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे.
2. सर्व प्रकारच्या जोखमींसाठी विमा संरक्षण घ्या : तुम्हाला आयुष्यात आरोग्य आणि अपघातासारख्या वैयक्तिक जोखमींव्यतिरिक्त व्यवसायात आग, चोरी, कर्मचा-यांकडून विश्वासघात, अपघात आदी जोखमींना सामोरे जावे लागते. समजा तुम्हाला काही इजा झालीच तर कर्जदात्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीचीही तरतूद करावी लागते. हे सर्व धोके विमा कंपन्यांकडे हस्तांतरित केले पाहिजेत. कर्जदात्यांच्या जोखमीसाठी मॅरीड वुमन प्रॉपर्टी अ‍ॅक्टन्वये आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतली पाहिजे. यामुळे विमा क्लेमच्या रकमेवर बायकामुलांसह इतर कोणीही दावा करू शकत नाही. कुटुंबासाठी योग्य विमा संरक्षण निश्चितच घेऊन ठेवावे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तुमच्या व्यवसायावर आर्थिक दृष्टीने परिणाम होणार नाही.
3. कर्मचा-यासारखेच व्यवसायात काम करा : व्यवसायातील शिस्त कायम राहावी म्हणून स्वत:च पगारी कर्मचा-याप्रमाणे काम करणे अभिनव ठरेल. यामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. पुढील वर्षी पगारही वाढवला जाऊ शकेल. व्यवसाय चांगला चालला तर स्वत:ला बोनसही देऊ शकता. व्यवसायात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी व्यवस्थित नियोजन करावे. यामुळे तुम्हाला पर्सनल फायनान्सच्या नियोजनात मदत होईल. मासिक उत्पन्न आणि खर्चाचा अचूक आकडा माहिती झाल्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीचा पर्सनल फायनान्ससाठी योग्य पद्धतीने वापर करू शकाल.
4. अकाउंटंट व अ‍ॅडव्हायझरमधील फरक समजा : प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीमध्ये त्याच्या क्षेत्रातील जाणकार असतो. चार्टर्ड अकाउंटंट हा तुमच्या खात्यांचे व्यवस्थापन करणे, कॉर्पोरेट अ‍ॅक्ट, ऑडिटमध्ये तुमचे साहाय्य करतो. याउलट वित्तीय सल्लागार हा धोक्यांचे व्यवस्थापन, गुंतवणूक योजना आदी बाबींत तुम्हाला मार्गदर्शन करतो. या दोन्हीही व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ असतात. यामुळे कोणता सल्ला कोणाकडून घ्यावा हेच आपण जाणून घेतले पाहिजे. तुम्हाला अचूक उत्तर हवे असेल तर योग्य व्यक्तीलाच प्रश्न करावा.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.