आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या सेडान कार श्रेणीत रंगणार किमतीचे युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) बुधवारी एक्सेंट ही नवी सेडान कार सादर केली. यामुळे कॉम्पॅक्ट सेडान कारच्या श्रेणीत किमतीचे युद्ध रंगणार आहे. एक्सेंटची प्रारंभिक किमत 4.66 लाख रुपये असून हाय एंड मॉडेलची किंमत 7.38 लाख रुपयांपर्यंत आहे. एक्सेंट आता मारुती-सुझुकीच्या स्विफ्ट डिझायर आणि होंडाच्या अमेझसह टाटाच्या लवकरच दाखल होणार्‍या जेस्ट या मॉडेलबरोबर स्पर्धा करणार आहे.

सध्या मारुती सुझुकीची डिझायर कॉम्पॅक्ट कार 4.85 लाखांपासून ते 7.32 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीच्या ह्युंदाईने एक्सेंट मॉडेल 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.1 लिटर डिझेल इंजिनसह बाजारात आणली आहे. ह्युंदाईने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ज्या प्लॅटफॉर्मवरून ग्रँड आय 10 ही कार सादर केली होती, त्याच प्लॅटफॉर्मवरून सेडान कारचे हे नवे व्हर्जन सादर केले आहे.

ह्युंदाई मोटारचे मुख्य व्यवस्थापक तसेच सीईओ बी.एस. सियो यांनी सांगितले, कंपनीच्या अत्यंत विश्वसनीय तंत्रावर तयार करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट सेडान एक्सेंटमध्ये दर्जा, डिझाइन, जागा, सुविधा आणि ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

या नव्या मॉडेलमुळे चालू आर्थिक वर्षात एकूण विक्रीत वाढ होईल, असा विश्वास कंपनीला आहे.
ह्युंदाई मोटार इंडियाने 2013 मध्ये एकूण 6.33 लाख कारची विक्री केली असून मागील वर्षापेक्षा ही विक्री 1.2 टक्क्यांनी कमी आहे.

एक्सेंट या नव्या मॉडेलसह ह्युंदाईने सेडान श्रेणीत परिपूर्णता मिळवली आहे. आता कंपनीच्या ताफ्यात एंट्री लेव्हलच्या चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या कारपासून ते प्रीमियम एक्झिक्युटिव्ह कारचा समावेश आहे.

जोरदार टक्कर
कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीत सध्या मारुती डिझायर आघाडीवर आहे. होंडाची अमेझ त्यापाठोपाठ असून एक्सेंटमुळे या श्रेणीत जोरदार स्पर्धा आगामी काळात दिसणार आहे.

तुलनात्मक किमती
0 डिझायर : 4.85 लाख ते 7.32 लाख रु.
0 अमेझ : 4.99 लाख ते 6.64 लाख रु.
0 एक्सेंट : 4.66 लाख ते 7.38 लाख रु .
(सर्व किमती एक्स शोरूम दिल्ली)