आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small,Midcap Fund Get Well Return, Crisil Report

स्मॉल, मिडकॅप फंडांचा भरीव परतावा,क्रिसिलचे निरीक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांवर आधारित म्युच्युअल फंड योजना इतर योजनांपेक्षा चमकदार कामगिरी करत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर 2013 या तिमाहीतील इक्विटी फंड योजनांवर आधारित क्रिसिलच्या ताज्या अहवालात ही बाब उघड झाली. औद्योगिक उत्पादनात जास्त गुंतवणूक आणि तेल तसेच वायू व ऊर्जा क्षेत्रावर कमी भर यामुळे स्मॉल कॅप व मिडकॅप फंड योजनांनी चांगले प्रदर्शन केल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले.
क्रिसिल-अ‍ॅम्फी स्मॉल अँड मिडकॅप परफॉर्मन्स इंडेक्स या नावाच्या या अहवालानुसार डिसेंबर अखेरपर्यंत स्मॉल व मिडकॅप इक्विटी फंडांनी या तिमाहीत इक्विटी आधारित इतर सर्व फंडांपेक्षा सर्वाधिक परतावा दिला आहे. क्रिसिलच्या मते, या सर्व फंडांनी गुंतवणुकीसाठी निवडलेली क्षेत्रे अचूक ठरली. त्यामुळेच या फंडांना चमकदार कामगिरी बजावता आली. विशेष म्हणजे, औद्योगिक उत्पादन क्षेत्रावर या फंडांनी भर दिल्याने त्यांच्या पदरात परताव्याचे भरभरून माप पडले. याउलट या फंडांनी तेल व वायू तसेच ऊर्जा क्षेत्रापासून चार हात लांब राहणे पसंत केल्याने त्यांचे नुकसान मर्यादित राहिले. क्रिसिलने केवळ डिसेंबर 2013 अखेर संपलेल्या तिमाही पुरतीच नव्हे, तर दीर्घकाळात या फंडांनी कसा परतावा दिला, याबाबतही चाचपणी केली आहे. अहवालानुसार मागील दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे या आधारवरही लार्जकॅप, डायव्हर्सिफाइड व ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम- कर बचतीच्या योजना) या योजनांपेक्षा स्मॉल व मिडकॅप फंडांची कामगिरी उत्तम राहिली. एवढेच नव्हे, तर बेंचमार्क सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सपेक्षा या क्षेत्राची कामगिरी सरस ठरली.
अहवालानुसार डिसेंबर 2013 अखेर संपलेल्या तिमाहीत सर्व क्षेत्रातील फंड योजनांनी आपापल्या बेंचमार्क इंडेक्सला परताव्याच्या बाबत पिछाडीवर टाकले आहे. याच काळात क्रिसिल-अ‍ॅम्फी स्मॉल अँड मिडकॅप फंड परफॉर्मन्स निर्देशांकाचा परतावा 19.21 टक्के राहिला, तर याच काळात सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकाचा परतावा 15.34 टक्के आणि सीएनएक्स निफ्टीचा परतावा 9.92 टक्के राहिला. फंड कंपन्यांबाबतही अहवालात भाष्य करण्यात आले आहे. अहवालानुसार क्रिसिल फंड श्रेणी-1 मध्ये प्रत्येकी आठ फंडांसह युटीआय म्युच्युअल फंड व बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडांनी आघाडी मिळवली आहे, तर सात योजनांसह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंडाने दुसरे स्थान पटकावले आहे. पाच फंड योजनांसह आयडीएफसी म्युच्युअल फंडाने तिसरे स्थान मिळवले आहे. क्रिसिलच्या या श्रेणीत डिसेंबर 2013 च्या अखेरच्या स्थितीनुसार खुल्या स्वरूपाच्या योजनांत (ओपन एंडेड स्कीम्स)एकूण गुंतवणुकीच्या 90 टक्के गुंतवणुकीचे प्रमाण आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर 2013 तिमाहीतील कामगिरी
19.21% परतावा दिला आहे स्मॉल व मिडकॅप योजनांनी
15.34% परतावा दिला सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकाने
9.92% परतावा दिला सीएनएक्स निफ्टीने
क्रिसिलचे फंड रँकिंग
फंड हाऊस टॉप रँकिंगमध्ये समाविष्ट स्कीम्स
यूटीआय म्युच्युअल फंड व बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंड
आयडीएफसी म्युच्युअल फंड