स्मार्टफोनचा स्मार्टनेस धोक्यात! / स्मार्टफोनचा स्मार्टनेस धोक्यात!

Apr 19,2012 01:16:56 PM IST

जगभरातील संगणक सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, 2012 मध्ये हॅकर्सचे मुख्य लक्ष्य स्मार्टफोन्स असेल. 2010 च्या तुलनेत स्मार्टफोन्सवर सायबर हल्ल्याच्या घटना 2011 मध्ये खूपच वाढल्या आहेत. 2012 मध्ये त्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘रशेल रॅटक्लिफ व्होमॅक’ या जगप्रसिद्ध डिजिटल सुरक्षा संस्थेच्या मते, शॉपिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या सुविधांमुळे हॅकर्सनी आता स्मार्टफोन्सकडे लक्ष वळवले आहे. स्मार्टफोन्समध्ये ठेवलेली वैयक्तिक माहिती, संपर्क आणि व्यावसायिक ई-मेल्सवरही हॅकर्सची नजर आहे. स्मार्टफोन्स वापरणा-या ग्राहकांना सावधानतेचा इशारा देताना या संस्थेने सांगितले की, जगभर याआधीही हॅकिंग होत आलेली आहे. मात्र स्मार्टफोन्सची हॅकिंग हा मोठा आणि गंभीर मुद्दा असल्याचे 2011 पासून समजले जात आहे. जाणकारांच्या मते, अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन्स हॅकर्ससाठी सर्वात आवडते स्मार्टफोन्स आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अँड्राइड बेस्ड स्मार्टफोन्सची संख्या वेगाने वाढत आहे. हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे हॅकर्स त्यावर सहजगत्या मोबाइलसाठी धोकादायक असलेले सॉफ्टवेअर वितरित करू शकतात.
हे माहीत आहे काय? ‘लूकआउट मोबाइल सिक्युरिटी’ने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, जगभरातील अँड्रॉइड उपयोगकर्त्यांना गेल्या वर्षी हॅकर्सनी कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 100 अँड्रॉइड फोनपैकी 4 फोनला हॅकिंगचा किंवा धोकादायक सॉफ्टवेअर लोड होण्याचा धोका आहे. संगणकाला जेवढा धोका हॅकिंग आणि मालवेअर-सॉफ्टवेअरपासून 15 वर्षांत निर्माण झाला, तेवढा धोका स्मार्टफोनला केवळ 2 वर्षांतच निर्माण झाला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. गुगलनेही गेल्या वर्षी मार्चमध्ये 2 लाख 60 हजार स्मार्टफोन उपयोगकर्त्यांना हॅकिंग अलर्ट जारी केला होता. या सर्व उपयोगकर्त्यांनी चुकून व्हायरस इन्फेक्टेड अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केले होते. धोक्याची घंटा मोबाइल फोन हॅकिंग संगणक हॅकिंगपेक्षाही धोकादायक असते. तेथे तुमची हेरगिरीही होऊ शकते, तुमच्या फोनद्वारे कॉलही होऊ शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरीस जाऊ शकते. संगणक हॅक झाल्याने जे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तुमचा फोन हॅक केल्याने होऊ शकते.
*तुमच्या स्मार्टफोनशी छेडछाड करून तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. सोबतच आर्थिक देवाणघेवाणीवरही नजर ठेवली जाऊ शकते.
*मोबाइलचा वापर करून संदेश पाठवला जाऊ शकतो.
*स्पायवेअरच्या साह्याने तुमचे लोकेशन ट्रेस केले जाऊ शकतात.
*तुमचे संभाषण ऐकले जाऊ शकते आणि ध्वनिमुद्रितही केले जाऊ शकते.
*फोनमधील तुमचे संपर्कही चोरले जाऊ शकतात.
मोबाइलला संगणक समजा उपयोगकर्ता आपल्या संगणकाबाबत जेवढे सजग असतात, तेवढे ते स्मार्टफोन्सबाबत नसतात. उत्तम सुरक्षेसाठी मोबाइल फोन हा संगणक असल्याचे समजा. -जेम्स लायने, सोफोस (ऑनलाइन सिक्युरिटी फर्म)
सुरक्षेसाठी तडजोड करू नका स्मार्टफोनच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करू नका आणि अधिकृत विक्रेत्याच्या अ‍ॅप्लिकेशनचाच वापर करा. विशेषत: बँकिंग आणि शॉपिंगसाठी वापरल्या जाणा-या अ‍ॅप्लिकेशनच्या सुरक्षा मानदंडांची आधीच तपासणी करा. - राहुल पुरोहित, वरिष्ठ सल्लागार, इन्फर्मेशन सिक्युरिटी
असे करतात हॅक
स्मार्टफोन हा एक प्रकारचा संगणकच आहे, जो खिशात ठेवला जातो. त्यामुळे तो हॅक करण्यासाठीही हॅकरला संगणक हॅक करण्याचे तंत्रज्ञान वापरावे लागते.
स्नूपवेअर स्नूपवेअर सॉफ्टवेअरच्या साह्याने आजकाल हॅकर्स स्मार्टफोन्स हॅक करत आहेत. सुरुवातीला स्नूपवेअरचा उपयोग आई-वडील मुलांच्या मोबाइल वापरावर नजर ठेवण्यासाठी करत होते. नंतर ते हॅकर्सनी आपले हत्यार बनवले. त्याद्वारे ई-मेल, टेक्स्ट संदेश, कॉलबरोबरच तुमच्या बँँकिंग ट्रान्झॅक्शनवरही नजर ठेवली जाते. स्मीफिशिंग हे संगणकावर होणा-या ई-मेल फिशिंगसारखे असते. त्यात हॅकर उपयोगकर्त्याला एक टेक्स्ट संदेश पाठवतो. सामान्यत: ते व्यवसायासंबंधी असतात. हा संदेश उपयोगकर्त्यास पासवर्ड अद्ययावत करण्याची, क्रेडिट कार्ड क्रमांक टाकण्याची, एखाद्या गोपनीय माहितीची मागणी करतो. स्पॅम स्पॅम संदेश पाठवूनही स्मार्टफोन हॅक करता येतो. असे संदेश इन्स्टॉलचा पर्याय देतात आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ते फोन बिघडवून टाकतात.ब्ल्यूटूथ
ब्ल्यूटूथ सुरू असेल तर हॅकरला तो स्मार्टफोन हॅक करणे खूपच सोपे जाते. ब्ल्यूटूथ हॅक झाल्यानंतर हॅकर तुमचा स्मार्टफोन व त्यात ठेवलेल्या आशयापर्यंत सहजगत्या पोहोचतो.

X