आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Corporat Responsbility To Relate The Business

सामाजिक उपक्रमांचा संबंध व्यवसायाशी जोडला जावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कंपनी कायद्यातील नव्या तरतुदीनुसार सामाजिक उपक्रम बंधनकारक ठरल्यानंतर उद्योगक्षेत्रात सर्वत्र त्याचीच चर्चा चालू आहे. या चर्चेचा सूर नकाराचा वा विरोधाचा नाही, तर हे समाजाचे देणे अधिक उपयुक्त आणि परिणामकारक कसे ठरेल, याचा विचार प्रामुख्याने होतो आहे. यामध्ये दोन स्पष्ट विचारप्रवाह आहेत. एका गटाला असे वाटते, की या सामाजिक उपक्रमांचा संबंध व्यवसायाशी जोडला जावा. दुस-या गटाचे म्हणणे आहे, की आपला उद्योग आणि सामाजिक उपक्रम यांच्या कक्षा स्पष्टपणे वेगळ्या असाव्यात. या दोन्ही विचारप्रवाहांची मंडळी सामाजिक उपक्रम अधिक संघटित आणि विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून व्हावेत, असेच म्हणणारी आहेत. या सर्व चर्चेतून खूप नवे मार्ग आणि शक्यता पुढे येत आहेत, हे महत्त्वाचे.
ब्यूटिशियन आता केवळ
शहरांची मिरासदारी नाही
स्त्रियांनी आपले सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी ब्यूटिशियनकडे जाणे, ही आता केवळ शहरांची मिरासदारी राहिली नाही. ग्रामीण भागातही हा व्यवसाय वाढतो आहे. यामधील संभाव्य वाढ लक्षात घेऊन गोदरेज कंपनीने ब्यूटिशियन ट्रेनिंग कोर्स सुरू केला आहे. या प्रशिक्षित स्त्रिया एखाद्या ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी करू शकतील किंवा स्वतंत्रपणे स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकतील. या प्रशिक्षणात स्वाभाविकपणे गोदरेजचीच सगळी सौंदर्यविषयक उत्पादने वापरली जातात. साहजिकच हे प्रशिक्षणार्थी आपल्या व्यवसायात गोदरेज उत्पादनांनाच प्राधान्य देतील, आणि एका अर्थाने गोदरेज उत्पादनांचे अ‍ॅम्बेसेडर बनतील, असे या कंपनीला वाटते आहे. रोजगारनिर्मिती आणि कौशल्याचे प्रशिक्षण हे दोन मुद्दे त्यांनी समोर ठेवले आहेत.
अंबुजा सिमेंटचा एखादा प्रकल्प सुरू होण्याआधीच त्यांची सामाजिक उपक्रमांची टीम त्या भागात पोहोचते. स्थानिक लोकांच्या गरजा, मागण्या, रोजगार क्षमता या सर्वांचे सर्वेक्षण करते आणि त्यानुसार आपले सामाजिक उपक्रम ठरवते. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी आरोग्यसेवा पुरवणारी वाहने आणि प्रशिक्षित कर्मचारी बारा गावांमध्ये ठेवले आहेत. जिल्ह्यातल्या 160 गावांना या वाहनांच्या माध्यमातून सर्व प्रकारची आरोग्यसेवा पुरवली जाते. गुजरातच्या जुनागडमध्ये कंपनीने संपूर्ण विभागात जलसंधारण प्रकल्प हाती घेतले. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे, यावर लक्ष ठेवूनही ते विविध उपक्रम राबवतात. टाटांचे पंचतारांकित हॉटेल जुनागडमध्ये येणार, असे कळताच त्यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर सुरू केले. जवळच एक वाहन उद्योग येत आहे, म्हटल्यावर त्यांनी ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणे सुरू केले. या उपक्रमांतून हजारोंना कौशल्य आणि रोजगार दोन्ही मिळाले.
भारती समूहाने रोजगारक्षमतेकडे
सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिले
भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी कौशल्याअभावी रोजगारक्षमता मात्र पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही. भारती समूहाने नेमक्या याच गोष्टीकडे सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिले आहे. दूरसंचार क्षेत्रात कौशल्यनिर्मितीतून अधिकाधिक रोजगार तयार व्हावेत, म्हणून त्यांनी आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. 50 कोटी डॉलर्सच्या या प्रकल्पातून उद्याचे दूरसंचार नेतृत्व तयार व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.राष्‍ट्रीय धोरण ठरवण्यासाठी तरुणांमधून योग्य तज्ज्ञ तयार व्हावेत, यासाठी ‘भारती’ने इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या सहकार्याने एक स्वतंत्र संस्था उभी केली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून ‘भारती’ग्रुपने 2006 पासून सत्यभारती स्कूल सुरू केले. आज त्यांच्या ग्रामीण भागात 254 शाळा आहेत. तिथे सर्वांना मोफत शिक्षण तर मिळतेच, पण पाठ्यक्रमाबाहेरचे उपक्रम राबवून आपल्या परिसरातील पर्यावरण, आरोग्य यांसारख्या गोष्टींची माहिती करून दिली जाते.
‘थरमॅक्स’ उद्योग पर्यावरण आणि
सौरऊर्जा या क्षेत्रात काम करणार
‘थरमॅक्स’सारखा उद्योग मुळातच पर्यावरण आणि सौरऊर्जा या क्षेत्रात काम करणारा आहे. पण त्यांना आपल्या या व्यवसायाशी सामाजिक उपक्रम जोडणे मंजूर नाही. गेल्या 6 वर्षांत शिक्षण, स्त्रियांचे सबलीकरण, ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी 24 कोटी रुपये गुंतवले आहेत. समाजातील दुर्लक्षित छोट्या गटात कौशल्याअभावी रोजगारक्षमता खूप कमी असते. त्यामुळे हे गट कायम मागासच राहतात. त्यासाठी ‘थरमॅक्स’ने कौशल्य वर्ग सुरू केले आहेत. सिम्बायोसिसच्या इंग्लिश लँग्वेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांनी 60 तासांचा एक स्वतंत्र कार्यक्रम तयार केला आहे. ‘थरमॅक्स’ने पुणे महापालिकेच्या शाळांमधून इंग्रजी, विज्ञान व गणित शिकवण्याचे उपक्रमही सुरू केले आहेत.
सरकारी, खाजगी उपक्रमात समन्वय
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक मोठे उद्योग पूर्वीपासूनच असे उपक्रम करत आहेत. ‘व्हिडिओकॉन’च्या वतीनेही शाळा, सुसज्ज रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र असे उपक्रम चालवले जातातच. पूर्वी सामाजिक भावनेतून देणगी किंवा यंत्र, वस्तू, इमारती दिल्या जात असत. आता प्रत्यक्ष समाजात जाऊन स्वतंत्र उपक्रमांना सुरुवात झाली आहे. एकाच प्रकारचे उपक्रम करणा-या उद्योगांमध्ये सर्वांनी एकत्रितपणे तसे उपक्रम राबवण्याचा विचार सुरू आहे. सरकारी उपक्रम आणि खाजगी उपक्रम यांच्या परस्पर समन्वयाबरोबरच सामाजिक संस्थांशी सहकार्य करण्याचा आग्रह उद्योगांत धरला जात आहे. यामधून समाजाचे देणे अधिक संघटितपणे, सुसूत्र आणि परिणामकारक ठरणारे होईल, यात शंका नाही.
-लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत