आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया एक नवा रोग !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार फेसबुक, ट्विटरसारखे सोशल मीडियाची साधने विविध अंगांनी व्यक्तीला मानसिक स्वरुपात दुबळे करत आहेत. सोशल मीडियामुळे निर्माण होणार्‍या नकारात्मक प्रभावांवर गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे.


इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठ आणि शालवता हेल्थ केअर सेंटरमध्ये झालेले संशोधन असे म्हणते की ‘सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत.’ लोकांमध्ये मानसिक रोग वाढीस लागले असून अनेक रोगांची लक्षणे दिसू लागली आहेत. सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव दाखवणारा हा काही पहिला अहवाल नाही. यापूर्वी सुद्धा अनेक संशोधकांनी याच्या वाईट परिणामांवर प्रकाश टाकला आहे, पण या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत लहान मुले सुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत.

सोशल मीडियाचे व्यसन लागलेले युवक कल्पनाविश्व, संभ्रम आणि नैराशाच्या आहारी गेल्याचे संशोधकांना अभ्यासात दिसून आले आहे. 2011 मध्ये निल्सन रिसर्च फर्मने केलेल्या एका पाहणीत असे दिसून आले की, इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटच्या तुलनेत युवावर्ग फेसबुकवर चार पट जास्त वेळ घालवतो. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी धूम्रपान, दारूचे व्यसन वाढते. या सवयी पुढे वाढत जाऊन त्याचा मानसिक स्थितीवर वाईट प्रभाव पडतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सायबर बुलिंगचा धोका
सोशल नेटवर्किंग साइटची आणखी एक वाईट बाजू म्हणजे सायबर बुलिंग. अमेरिकेत ही समस्या मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. अमेरिकेतील अनेक किशोरवयीन मुलांवर याचा परिणाम दिसून येत आहे. सोशल नेटवर्किंगमुळे युवक आत्मकेंद्रित होत असून स्वत:ची स्तुती ऐकणे त्यांना आवडू लागलेले आहे.

सोशल मीडियाने दिले हे पाच रोग
सोशल मीडियाचा अतिवापर करणार्‍याला सर्वसाधारणपणे हे पाच आजार होण्याचा धोका असतो.

1. खाण्याकडे दुर्लक्ष
सेंटर फॉर इटिंग डिसऑर्डर शेपर्ड प्रॅट संस्थेने सोशल मीडियाचा वापर करणार्‍या 600 लोकांचा अभ्यास केला. यात त्यांना आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट निदर्शनास आली. अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक सोशल मीडियातील वैयक्तिक माहितीवर टाकण्यात आलेल्या फोटोविषयी फारच संवेदनशील होते. दुसर्‍यांचे फोटो पाहून त्यांच्यासारखी शरीरयष्टी करणे किंवा तसे दिसण्याच्या लोभापोटी डायटिंगचा पर्याय स्वीकारला होता.

2. स्वत:ला कमी लेखणे आणि नैराश्य
मित्राचे फोटो आणि त्यांना मिळणारे लाइक यांचा देखील विपरीत परिणाम दिसतो. मित्रांना मिळणारे लाइक पाहून व्यक्ती एकदम निराश होते आणि स्वभाव उदासीन होतो. स्वत:ची तुलना इतरांशी करून स्वत:ला कमी लेखण्याचे प्रमाण वाढते. परिणामी आत्मविश्वास घटतो आणि नैराश्य वाढते.

3. मानसिक आजार
कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्रोफेसर डॉ.लॅरी डी रोसन म्हणतात की, ‘तरुण पिढी आपला बहुतांश वेळ सोशल नेटवर्किंग साइटवर घालवते. यामुळे त्यांच्यात मानसिक आजाराच्या समस्या वाढत चालल्या आहेत. मॅनिया, पॅरानोइया, अग्रेसिव्ह टेंडेंसिज, समाजविरोधी वागणे अशा समस्यांचा यात समावेश आहे.

4. तणाव
सोशल नेटवर्किंग साइटमुळे अनेक तरुण तणावात राहत असल्याचे एडिनबर्ग नेपियर विद्यापीठाने केलेल्या सव्र्हेत स्पष्ट झाले आहे. काही युवकांमध्ये फीअर ऑफ मिसिंग आउट प्रकारची नवी भीती दिसत आहे.

5. व्यसन
चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया या देशांनी अलीकडेच इंटरनेटच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. सोशल नेटवर्किंगचे व्यसन सोडणे अतिकठीण असल्याचा दावा शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.