आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलार शेफ : साध्या तंत्रातून उलगडले सौर चुलीचे सुलभ तंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळपता सूर्य आणि उघड्या हवेत शिजवलेले अन्न हा ताजेतवाने आणि आरोग्यदायी राहण्याचा उत्तम मार्ग आहे. आयुर्वेदातील चरक संहितेतील ब्रीदानुसार सोलार शेफचे कार्य चालते. अत्यंत सहजपणे उपलब्ध असलेल्या सौरऊज्रेचा स्वयंपाकासाठी वापर कसा करता येईल, या विचारातून सोलार शेफची संकल्पना आकारात आली. त्याला जोड मिळाली ती साध्या तंत्रज्ञानाची. आयआयटी झालेल्या जालन्याच्या विवेक काबरा यांनी ही किमया साधली आहे. द सोलार शेफची महती आता देशभर कळाली आहे. अनेक गावातून त्याला मोठी मागणी आहे. मागणीनुसार तंत्रात बदल करून आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकोपयोगी करण्याकडे काबरा यांचा कल आहे.

सोलार शेफचा मुख्य ग्राहक ग्रामीण भागाशी निगडित आहे. आयआयटी करूनही या क्षेत्रात आल्याबद्दल काबरा यांना विचारले. ते सांगतात, मी लहान असताना एका नातेवाइकाने आम्हाला एक सौर चूल भेट दिली होती. माझी आई शारदादेवी काबरा त्यावर नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवायची.त्या पदार्थांची चव गॅसवर तयार करण्यात आलेल्या पदार्थांपेक्षा वेगळी आणि रुचकर असायची. तेव्हापासून या सौर चुलीचे मला आकर्षण. पवईतील आयआयटीत असतानाही नोकरीचे आकर्षण नव्हते. स्वत:चा व्यवसाय असावा. समाजोपयोगी काहीतरी करावे ही भावना होती. त्यात एम.टेक. चा थिसिस करत असताना जागतिक आरोग्य संघटनेचा सोलारबाबतचा अहवाल वाचण्यात आला. सोलार कुकिंगमुळे अन्नातील 30 ते 70 टक्के पौष्टिक घटकांचा र्‍हास होत नाही. गॅसवरील स्वयंपाकात तो अधिक प्रमाणात होतो. अनेक विकसनशील देशात आजही लाकूड (सरपण) मोठय़ा प्रमाणात वापरतात. लाकडाच्या धुरात अनेक विषारी घटक असतात. सरपणावर स्वयंपाक करणार्‍या महिलेच्या श्वासाद्वारे हे घटक तिच्या शरीरात जातात. सरपणावर स्वयंपाक करताना 20 सिगारेट इतके धुम्रपान होते. अशा अनेक धक्कादायक बाबी कळल्या. त्यामुळे सौरऊज्रेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्र आणायचे ठरवले. त्यातूनच सौर आचारी अर्थात सोलार शेफ आकारास आले. जालन्यातील उद्योजक सुनील रायठठ्ठा तसेच सुनील गोयल यांच्या भागीदारीतून हा व्यवसाय चांगला बहरला. पारंपरिक पद्धतीला छेद दणारे तंत्र आणणे हे मोठे आव्हान होते. पारंपरिक पद्धतीच्या सौर चुलीत काच आणि अँल्युमिनियमचा वापर ोठय़ा प्रमाणात होता. त्यामुळे त्याचे वजन अधिक होते. काच फुटल्यामुळे नुकसान होण्याचा धोका होता. सिंगल रिफ्लेक्टर असल्यामुळे त्यात अनेक अडचणी होत्या. आम्ही यावर अधिक संशोधन केले. काचेऐवजी पॉलिमरचा वापर केला. त्यामुळे वजन 4 ते 5 किलोने कमी झाले. फुटण्या-तुटण्याची समस्या कमी झाली. चारहीबाजूंनी एक थराचे सपाट आणि उतार असणारे पॅनल तयार केले. त्यामुळे दर तीन तासांनी ते हलवण्याची गरज उरली नाही. आमचे उत्पादन ग्राहकोपयोगी ठरले. आम्ही तीन प्रकारचे बेसिक मॉडेल तयार केले. नॉर्मल सोलार. हे पाच व्यक्तींसाठी जेवण तयार करण्यासाठी उपयोगी आहे. तेजस हे फोल्ड करता येणारे अत्यंत किफायतशीर आहे. तेजसची क्षमता 3 लिटर असून भात आणि वरण तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तिसरे मॉडेल पॅराबोलिक असून संस्थात्मक किंवा मोठय़ा प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी वापरता येते. यात तीन तासांत 25 किलो तांदळाची खिचडी तयार होते. वेळेची, पाण्याची बचत आणि पर्यावरण पूरकता लक्षात घेता याची किंमत परवडणारी आहे.
सोलार शेफचा बारीपाडा पॅटर्न- सोलार शेफच्या उत्पादनानी ग्रामीण भागात चांगली गती घेतली आहे. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे अदिवासी गाव. हे गाव जल व वन संर्वधनासाठी अधिक प्रसिद्ध आहे. यागावचे चैतराम पवार यांच्या कानी सोलार शेफची कीर्ती गेली. त्यांनी बारीपाडातील ग्रामस्थांना सौर चुलीचे महत्त्व सांगितले. आज बारीपाड्यातील 50 टक्क्यांहून अधिक घरात सौर आचारी आहेत. याशिवाय बंगळुरू, कोची, हैदराबाद, दिल्ली, सुरत येथून अधिक मागणी असल्याचे विवेक यांनी सांगितले.
शाळांमध्ये कार्यशाळा- अनेक शाळेमध्ये कार्यशाळा घेऊन सौरऊज्रेचे महत्त्व समजावून सांगतो, असे काबरा यांनी सांगितले. त्यात कार्डबोर्डपासून सौर चूल विद्यार्थ्यांकडून बनवून घेतो. त्यातच अन्न शिजवून घेतो. ते त्यांना खायला लावतो. यामुळे मोठय़ा प्रमाणात जागृती होते. कार्डबोर्डपासून सौर चूल तयार करण्यास अवघे 200 रुपये लागतात. ही सौर चूल वर्षभर टिकते. सध्या आमची उलाढाल 4 ते 5 लाखांवर असून 4 ते 5 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आगामी काळात मोठय़ा प्रमाणात विस्तारीकरण करण्याची योजना आहे.

कंपनीचा पत्ता : 293, रामकृष्ण, पार्श्वभूमी प्रेसच्या बाजूला, संभाजीनगर, जालना

ई-मेल: vivekkabra@aol.in संकलन : अजय कुलकर्णी
हे सदर कसे वाटले ? जरूर कळवा..
feedback.abd@dainikbhaskargroup.com
पुढील शुक्रवारी : स्वराज इंजि.