आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी काही ब्रँड न्यू सेक्टर्स व मिळणारा बोध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिटेल सेक्टरमधील गुंतवणुकीतून खूप फायदा
नव्या सेक्टरचा आढावा आपण अशासाठी घेत आहोत, की अनेकदा त्यातील गुंतवणूक ही जास्त जोखीम-जास्त नफा या प्रकारात येते. म्हणजे झाला तर खूप नफा, नाहीतर खूपच नुकसान. मागील लेखात आपण टेलिकॉम व एंटरटेनमेंट व मीडिया या दोन नव्या सेक्टरकडे आपण नजर टाकली. रिटेल सेक्टर हाही नवा सेक्टर आहे. छोटी किराणा, कापडाची दुकाने अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत, पण मोठ्या कंपन्यांनी त्यांचे सुपरमार्केट, हायपरमार्केट ठिकठिकाणी सुरू केले, त्या कंपन्यांचे शेअर शेअरमार्केटमध्ये आले, त्यामुळे हा नवा सेक्टर उदयास आला. यातील एक मोठी कंपनी आहे किशोर बियाणींची फ्युचर रिटेल लिमिटेड. बिग बझार व फूड बझार आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे, ते याच कंपनीचे. याचे आधी नाव होते पँटालून रिटेल इंडिया लिमिटेड. 1987 पासून व्यवसायात असलेल्या या कंपनीचा 1992मध्ये आयपीओ आला होता व फक्त 10 रुपये मूल्याने त्याचे शेअर विक्रीस आले होते. जून 2013मध्ये या शेअरचा भाव 140 रुपये आहे. यातून गुंतवणूकदारांना खूप फायदा झालेला आहे.


शॉपर्स स्टॉप व टाटाचे ट्रेन्ट शिवाय क्रोमा स्टोअर्सही
या उलट कुटॉन्स रिटेल इंडिया लिमिटेडचा 2007मध्ये आयपीओ आला होता व 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले त्याचे शेअर 405 रुपये मूल्याने विक्रीस आले होते. आता जून 13मध्ये या शेअरचा भाव फक्त 4.90 रुपये आहे. म्हणजे वेळेवर तो विकून टाकला नसेल, अजून होल्ड करून ठेवला असेल, तर यात प्रचंड नुकसान झालेले आहे. या कंपनीची ही अवस्था तर याच क्षेत्रातील सुभिक्षा ही कंपनी दिवाळखोरीत गेली. याची कारणे आपण बघू, पण त्या आधी रिटेल सेक्टरमध्ये इतर कोणत्या कंपन्या आहेत ते बघू. अतिउच्चभ्रू वर्तुळासाठी खरेदीचे ठिकाण म्हणून शॉपर्स स्टॉप व टाटाचे ट्रेन्ट या दोन कंपन्या या क्षेत्रात आहेत. शिवाय क्रोमा स्टोअर्सही टाटाचेच आहेत. याशिवाय प्रोव्होग व केवल किरण क्लोथिंग या कंपन्याही रिटेल क्षेत्रात आहेत. या नव्या कंपन्यांबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज ही ऑइल अँड गॅस क्षेत्रातील मोठी कंपनीही या रिटेल व्यवसायात उतरली आहे. रिलायन्स फ्रेश, डिजिटल इत्यादी त्यांचेही स्टोअर्स आहेत. त्यांनीही 2012-13 या आर्थिक वर्षात या व्यवसायात 10,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. रिलायन्ससारखेच आदित्य बिर्ला ग्रुपही त्यांच्या ‘मोर’ स्टोअर्सच्या माध्यमातून या क्षेत्रात आहे, पण काही कंपन्या का नुकसानीत जातात, हे बघितले तर दिसते की कर्ज घेऊन त्या विस्तारीकरण करतात, पण ते करताना नफा किती मिळेल याचा विचार करत नाहीत. त्यांच्या अपेक्षा अवास्तव असतात. तितकी विक्री ते साध्य करू शकत नाहीत आणि दुसरीकडे कर्ज व व्याजाचा बोजा वाढत जातो.


खासगीकरणामुळे उदयास आलेले एयरलाइन्सचे क्षेत्र
रिटेलसारखेच एअरलाइन्स कंपन्या हेही खासगीकरणामुळे उदयास आलेले क्षेत्र. यात जेट एअरवेज, स्पाइसजेट व किंगफिशर एअरलाइन्स अशा कंपन्या आहेत. यापैकी विजय मल्ल्या या उद्योजकाची किंगफिशर कंपनी बँकांची कर्ज थकवल्याने बदनाम झाली आहे. इथेही गुंतवणूकदारांना खूप नुकसान सोसावे लागलेले आहे.


एज्युकेशन सेक्टरही फॉर्मात, कोचिंग क्लासेस, प्री स्कूल ई
एज्युकेशन सेक्टर हाही नवा. एज्युकॉम्प सोल्युशन्स, एडसर्व्ह सॉफ्टसिस्टम, एव्हरॉन एज्युकेशन या काही कंपन्यांच्या शेअरचे भाव खूप खाली आले आहेत. एडसर्व्ह सॉफ्टसिस्टमचा भाव जो 2010मध्ये 307 रुपये झाला होता, तो आता मे 2013मध्ये केवळ 3 रुपये 70 पैसे आहे, कारण कंपनीवर काही आरोप आहेत. इतर कंपन्यांपैकी अ‍ॅप्टेक, एनआयआयटी या तुलनेने जुन्या कंपन्या. एमटी एज्युकेअर म्हणजे महेश ट्युटोरिअल्स या नावाने कोचिंग क्लासेस चालवणारी कंपनी, तर ट्री हाऊस एज्युकेशन ही प्री स्कूल इत्यादी चालवणारी कंपनी. या दोन कंपन्या व्यवस्थित व्यवसाय करत आहेत, कारण त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल वेगळे आहे.


या एकदम नव्या - ब्रॅन्ड न्यू सेक्टरवर व त्यातील काही कंपन्यांवर आपण धावती नजर टाकली. त्यातूनही आपल्याला दिसले प्रत्येक सेक्टरमध्ये काही कंपन्या चक्क दिवाळखोरीत गेल्या आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. यातील गुंतवणुकीतून प्रचंड नुकसान सहन करावे लागलेले आहे. अगदी जुन्या सेक्टरमधील कंपन्याही बंद पडू शकतात किंवा त्या सेक्टरला वाईट दिवस येऊ शकतात. पण नव्या सेक्टरबाबत आधी एक हवा तयार होते. अनेक जण त्यात गुंतवणूक करतात आणि ती वरच्या भावात करतात. नंतर एक एक समस्या समोर यायला लागतात आणि भाव कोसळतात.

म्हणजेच जुने सेक्टर व नवे सेक्टर यामध्ये फरक असा, की नव्या सेक्टर्सच्या व्यवसायाचे सूत्रच बरोबर नाही, असे नंतर लक्षात येते किंवा जितकी अपेक्षा असते त्या प्रमाणात त्या विस्तार करू शकत नाहीत. तसेच अशा नव्या सेक्टरमधील काही कंपन्यांचे प्रवर्तकही नवे असतात. ते किती टिकाव धरू शकतील, किती विश्वासार्ह आहेत, व्यवस्थापन पारदर्शी आहे का, ते नंतर कळते. त्यामुळे इथे गुंतवणूक करताना दुहेरी काळजी घेणे आवश्यक आहे. आधी या सेक्टरचा व्यवसाय समजून घेणे, तो किती दम धरू शकेल, त्याला किती भांडवलाची गरज आहे, त्याचे उत्पन्नाचे मॉडेल काय आहे, हे सर्व जाणून घेणे हे महत्त्वाचे. तसेच सेक्टरविषयी खात्री झाल्यानंतर मग यातील कंपन्या, त्यांचे मॅनेजमेंट, किती काळापासून व्यवसाय करत आहे, इत्यादी विषयी सविस्तर माहिती मिळवणे आवश्यक आहे. फ्युचर रिटेल लिमिटेडमधील एकदम सुरुवातीच्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा झाला, तसा इतरही कंपन्यांमधून मिळू शकतो; मात्र सावधगिरी बाळगणे व जेव्हा भाव अवास्तव वर जातात तेव्हा नफावसुली करणे हे हिताचे.