बीड - यंदा अपु-या पावसामुळे पिके पुरेशी भरली नाहीत. दहा ते बारा क्विंटलऐवजी उतारा अर्ध्यावर घटल्याने बाजारात आवक कमी होत असली, तरी उचल न घेतलेल्या सोयाबीनचे भाव दहा दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी वधारले. सध्या बाजारात सोयीबीनला ३२०० ते ३४२५ रुपये भाव मिळत असून काही प्रमाणात तेजीनंतर भाव स्थिरावतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
दिवाळी पाडव्यापासून सोयाबीनची आवक सुरू झाली. त्या वेळी ३०७० रुपये भाव होता; परंतु दहा दिवसांत क्विंटलमागे आधी १०० व नंतर २०० रुपयांची तेजी होत गेली. एकूण ३०० रुपयांची तेजी झाल्याने बाजारात सध्या आवक वाढली आहे. दहा दिवसांत बीडच्या मोंढ्यात दररोज पाचशे क्विंटल आवक झाली, तर गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व धारूर बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात आवक झाली.
साेयाबीनच्या प्रक्रिया उद्योगांकडून मागणी सुरू झाल्याने ३४५० ते ३५२५ रुपये क्विंटल भाव मिळत असून या दरात पाच दिली जात आहे. धुळे, जालना, नगर, सांगली, जयसिंगपूर, लातूर, सोलापूर, नांदेड, हिंगोलीसह परळी येथील सोया प्लांटशी वाहतूक दराचा अंदाज घेत व्यापा-यांनी व्यवहार केले.
तुरीचा तोरा
अवर्षणामुळे संभाव्य पिकांची हमी नसल्याने तुरीची मागणी वाढत आहे. दालमिलकडून मागणी सुरू झाल्याने आठवड्यात क्विंटलमागे २०० रुपयांची तेजी आली. दालमिलकडून ५३०० ते ५५०० रुपये क्विंटलपर्यंत तुरीला भाव मिळाला.
कडधान्यात तेजीचे वारे
खरिपात यंदा मुगाचे उत्पादन कमालीचे घटल्याने स्थानिक बाजारपेठेत क्विंटलमागे १५०० रुपये तेजी राहिली. हरभ-याचे भाव २५०० ते ३००० रुपये होते. तुरीची स्थानिक आवक नगण्य असली, तरी मागणी असल्याने भाव ४८०० रुपये क्विंटल मिळत आहे. ट्रकलोडिंगचे व्यापार व्यवहार ५३०० ते ५५०० रुपये क्विंटलप्रमाणे झाले. विशेष म्हणजे काळ्या तुरीमध्येही ५०० रुपयांची तेजी आली. उडदामध्येही क्विंटलमागे ५०० रुपये तेजी आहे. भाव ४५०० ते ५००० रुपये होते.
ज्वारी कडाडली
बाजरीची आवक येथील बाजारात दररोज ३०० क्विंटल आवक असून गावरान बाजरीचे भाव २३०० ते २६०० रुपये होते, तर बाजरीला १४०० ते १६५० रुपये भाव मिळाला.
गावरान ज्वारीची आवक कमीच आहे. १५०० ते १७०० रुपयांपर्यंतच्या ज्वारीचे भाव २२०० रुपयांपर्यंत पाेचले.