आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाइस मिस्टचा दरवळ आता प्रत्येक शहरांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टाटा टीप्रमाणे आता स्पाइस मिस्ट या नावाने विलायची तसेच काळा मसाला उपलब्ध होणार आहे. साउथ इंडियन ग्रीन कार्डमम कंपनीच्या (एसआयजीसीसी) या उत्पादनाचे मार्केटिंग टाटा ग्लोबल बेव्हरेज करणार आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी स्पाइस मिस्ट लाँच केली.

एसआयजीसीसीने स्पाइस मिस्टच्या निर्यातीची तयारीही केली आहे. विलायची आणि काळा मसाल्याची ही उत्पादने बाजारात आणल्यामुळे छोट्या उत्पादकांची मध्यस्थांपासून सुटका होणार आहे. या उत्पादनांना सातत्याने मागणी असल्याने त्यांच्या किमतीत एकदम घसरण होत नसल्याचे कंपनीने सांगितले. शर्मा म्हणाले, विलायची आणि काळा मसाल्यासारख्या उत्पादनाचे ब्रँडिंग टाटा ग्लोबलच्या मदतीने करणे ही महत्त्वाची बाब आहे.
विलायची उत्पादकांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी 2006 मध्ये एसआयजीसीसी कंपनीची स्थापना झाली. कंपनीचे संचालक सॅम मॅथ्यू कलरीकल यांच्या मते, टाटा ग्लोबलच्या मदतीने या उत्पादनाचे ब्रँडिंग केल्यामुळे टाटा टीप्रमाणे स्पाइस मिस्ट येत्या आठ महिन्यांत देशातील खेड्या-पाड्यात पोहोचेल. मंगळवारपासून स्पाइस मिस्ट दिल्ली आणि चंदिगड येथील दुकानात उपलब्ध असेल. येत्या 11 मार्चपासून हैदराबाद आणि मदुराईतही विक्री सुरू होणार आहे. विलायचीच्या ठोक व किरकोळ विक्री किमतीत खूप अंतर असते. मात्र, याचा लाभ उत्पादकांना मिळत नाही. त्यामुळे स्पाइस मिस्ट बाजारात आणण्यात आले आहे.

टाटा ग्लोबल बेव्हरेजचे उपाध्यक्ष आर. के. कृष्णकुमार म्हणाले, स्पाइस मिस्ट बाजारात आल्याने विलायची तसेच काळा मसाल्याच्या किमतीतील चढ-उताराला स्थैर्य लाभेल. याचा फायदा उत्पादकांना होईल. स्पाइस ब्रँडच्या 50 ग्रॅम विलायची पॅकची किंमत 115 रुपये तर काळा मसाल्याच्या 50 ग्रॅम पॅकची किंमत 42 रुपये राहील. विलायची 10 तसेच 20 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध राहील.