आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Staff To Director.....That Three Girls Travelling

कर्मचारी ते संचालक... त्या तिघींचा प्रवास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छाया परब, ज्योती बाबर, शिल्पा पवार या तिघी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुली. बी. कॉम. झाल्यावर ऑफिस असिस्टंट म्हणून एका कंपनीत नोकरीला लागल्या. या तिघांची ओळखही याच कंपनीतली. ही कंपनी कसली? तर आर. एस. अय्यर या तरुण अभियंत्याने नोकरी सोडून नुकताच छोटा उद्योग सुरू केला होता. त्या कंपनीत म्हणजे अय्यर यांच्या चेंबूर येथील घरातील गॅरेजमध्ये असलेल्या छोट्याशा कार्यालयात या तिघींची नोकरी सुरू झाली. आज या घटनेला 13 वर्षे पूर्ण झाली. सध्या या कंपनीची उलाढाल तब्बल 22 कोटी रुपयांवर पोहोचली असून आणि अय्यर सरांबरोबर या तिघी या कंपनीत संचालक झाल्या आहेत. कष्टाची दखल घेत अय्यर यांनी आम्हाला संचालक केले, त्या तिघी सांगत होत्या. अशा प्रकारे कर्मचारी ते संचालक अशी वाटचाल करीत ‘कॉर्पोरेट कल्चर’मध्ये एक नवा आदर्श अय्यर यांनी घालून दिला आहे.

शून्यातून साम्राज्य उभे केलेल्या या कंपनीचे नाव ईशा मीडिया रिसर्च लि. 90 च्या दशकात ज्यावेळी चॅनल्सची सुरुवात होत होती त्यावेळी असलेल्या मोजक्या चॅनल्सवर करमणुकीचे कार्यक्रम दिवसातून काही तास होते. न्यूज चॅनल्स अजून जन्माला यायची होती. मात्र बातम्यांविषयी तास-दोन तासांचे कार्यक्रम होते. अशा वेळी या कार्यक्रमांच्या टेप्स पुरवण्याचे काम आर. एस. अय्यर या तरुण अभियंत्याने सुरू केले होते. अय्यर यांनी काही वर्षे विविध कंपन्यांत अनुभव घेऊन स्वत:चा काही तरी उद्योग सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. यातून त्यांना या उद्योगाची कल्पना सुचली. जशी चॅनल्स वाढत गेली तसा या कंपनीचा कारभार वाढू लागला.

सुरुवातीच्या काळात छाया परब, ज्योती बाबर, शिल्पा पवार या तिघी जणी ऑफिस अस्टिस्टंट म्हणून काम पाहू लागल्या. त्यानंतर कर्मचा-यांची संख्या हळूहळू सातवर गेली. प्रारंभीच्या काळात पगारही काही मोठा नव्हता, परंतु काम करण्याचा आनंद मिळत होता. त्याकाळी कुणी विचारायचे, तुम्ही नोकरी कुठे करताय? त्यावेळी लोकांना चॅनल्सचे कार्यक्रम टेप करून लोकांच्या गरजेनुसार ते कार्यक्रम पुरवण्याच्या क्षेत्रात आम्ही आहोत, असे सांगितले तर लोकांना काहीच समजायचे नाही. कारण हा उद्योगच जरा हटके होता. अनेकांना आम्ही केबल टी.व्ही.च्या कंपनीत कामाला आहोत, असे वाटायचे, छाया परब आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. कंपनी जशी वाढत गेली तसे कार्यालय गॅरेजमधून चेंबूरच्या पॉश इमारतीत आले. कर्मचा-यांची संख्या 100 वर गेली. आम्ही सुरुवातीपासूनच कामात झोकून दिलेले असल्याने वाढते काम आम्ही आनंदाने स्वीकारले. 10 ते 5 अशी टिपिकल नोकरी केली नाही. कामात नवीन शिकण्याची संधी मिळत गेल्याने दुसरी नोकरी शोधावी असेही कधी वाटले नाही. काम अंगावर पडत गेले आणि आम्ही त्यातली माहिती करून घेत पुढे जात होतो. कामाचा वाढता व्याप लक्षात घेता कंपनीतील कामे आम्ही वाटून घेतली आणि नव्या आव्हानांना आम्ही सामोरे गेलो, असे ज्योती बाबर म्हणाल्या.


गेल्या पाच वर्षांत विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेते ‘क्लायंट’ आहेत. एवढेच कशाला पोलिस, गुप्तचर खात्यालाही एखाद्या गुन्ह्यांच्या बाबतीत जर ‘क्लिप’ लागल्यास ते इशाचीच मदत घेतात. मात्र इशाच्या व्यवस्थापनाने ही सेवा अशा सरकारी संस्थांना मोफत देण्याचे ठरविले आहे. मात्र अन्य ‘क्लायंट’कडून मात्र ही सेवा शुल्क आकारून दिली जाते. या सेवेत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी देता येईल हे इशा मीडियाने पाहिले. यासाठी एखाद्याला कार्यक्रमाची सी.डी. देण्यापेक्षा थेट त्याच्या मेलवर ‘क्लिप’ पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या ग्राहकाला ऑनलाइन पैसे भरून त्वरित ‘क्लिप’ मिळू शकते. त्यासाठी त्याला कंपनीच्या कार्यालयात येण्याची गरज भासत नाही. आता पुढील टप्प्यात चॅनल्सच्या कार्यक्रमाचे रेटिंग अत्याधुनिक व शास्त्रीय मार्गाने करण्याच्या क्षेत्रात कंपनीने उतरण्याचे ठरविले आहे. सध्या चॅनल्सचे रेटिंग सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून केले जाते, परंतु यात पारदर्शकता नाही. त्यामुळे ‘ट्राय’ने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कंपनी आता रेटिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. अशा प्रकारे कंपनी आता विस्तारासाठी नवीन क्षितिजे पाहत असताना छाया परब, ज्योती बाबर, शिल्पा पवार या तिघा संचालकांची जबाबदारी वाढणार आहे.