आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड रिझल्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी तिचा ईपीएस म्हणजे र्अनिंग पर शेअर आणि पीई रेशिओ म्हणजे प्राइस टूर्अनिंग रेशिओ किती आहे ते बघितले जाते. हे बघण्यासाठी सहसा गुंतवणुकीसंबंधीच्या साइटचा उपयोग केला जातो, पण वेगवेगळ्या साइटवर हे आकडे वेगवेगळे दिसतात. किरकोळ फरक असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येतो. फार मोठा फरक असेल तर? उदा. टाटा मोटर्सचा ईपीएस एका साइटवर 0.94 फक्त इतका आहे. त्यामुळे पीई 314.15 इतका जास्त फुगलेला दिसतो. तर दुस-या साइटवर ईपीएस 31.56 व पीई 9.18 दाखवला आहे. हिशेबासाठी कंपनीचे कोणते रिझल्ट विचारात घेतले आहेत त्यानुसार हा फरक पडतो. कंपनीचा स्टॅँडअलोन रिझल्ट विचारात घेतल्यामुळे पहिल्या साइटवर टाटा मोटर्सचा ईपीएस फक्त 0.94 आणि पीई 314.15 आहे तर दुसर्या साईटने कन्सॉलिडेटेड रिझल्ट विचारात घेतल्यामुळे ईपीएस 31.56 व पीई 9.18 आहे. हे स्टॅँडअलोन व कन्सॉलिडेटेड म्हणजे काय ते समजून घेऊ.


कन्सॉलिडेटेड म्हणजे प्रमुख (पॅरेंट) कंपनी आणि तिच्या उपकंपन्या (सबसिडिअरीज) आणि असोसिएटेड कंपन्या या सर्वांचा एकत्रित रिझल्ट. या सर्व कंपन्यांचे उत्पन्न, खर्च, नफा, तोटा इत्यादी हिशेबात घेऊन मिळालेली आकडेवारी. उलट स्टॅँडअलोन म्हणजे फक्त आणि फक्त पॅरेंट कंपनीचीच आकडेवारी. पॅरेंट कंपनीला नफा झाला, पण तिच्या उपकंपन्यांना त्यापेक्षा जास्त तोटा झाला असेल तर मग कन्सॉलिडेटेड रिझल्टमध्ये तोटा दिसेल तर स्टॅँडअलोन रिझल्टमध्ये नफा दिसेल. मुळात कंपन्यांना एकाच कंपनीच्या नावाखाली व्यवसाय करण्याऐवजी उपकंपन्या सुरू करून व्यवसाय करणे अनेक कारणांमुळे सोयीचे असते. अशा वेगळ्या कंपन्यांमुळे प्रत्येक कंपनीची कामगिरी जोखता येते, कर नियोजन योग्य करता येते. परदेशात व्यवसाय करण्यासाठीही उपकंपन्या सुरू करणे सोयीचे असते.

तथापि कन्सॉलिडेटेड रिझल्ट तयार करणे हे गुंतागुंतीचे व क्लिष्ट काम आहे. हे तयार करताना महत्त्वाचे तत्त्व आहे या सर्व कंपन्या मिळून फक्त एकच कंपनी आहे असे मानून ते तयार करणे. याचा अर्थ या कंपन्याचा एकमेकांशी जो व्यवसाय झाला आहे तो वगळला जातो. उदा. पॅरेंट कंपनीने आपल्या उपकंपनीला उत्पादनाची जी विक्री केली असेल ते आकडे हिशेबात घेतले जात नाहीत. कारण, तो इन्ट्रा-ग्रुप व्यवहार आहे. त्याचप्रमाणे एका कंपनीने ग्रुपमधील दुस-या कंपनीला कर्ज दिलेले असेल तर तेही बॅलन्सशीटमधून वगळले जाते. असे करण्याचे कारण म्हणजे डबल एंट्रीज होतील.

समजा अबक मोटर्सने 100 मोटारी बनवल्या व आपल्याच कखग या उपकंपनीला त्या विकल्या, नंतर कखगने त्या प्रत्यक्षात डिलरना विकल्या. मग याठिकाणी अबकने 100 मोटारी विकल्या व पुन्हा कखगने 100 मोटारी विकल्या असे हिशेबात घेतले तर 200 मोटारींची विक्री झाली असा त्याचा अर्थ होईल. प्रत्यक्षात फक्त 100 मोटारींचे उत्पादन झालेले आहे. अशा इंट्रा-ग्रुप व्यवहारांपैकी कोणत्या एंट्रीज घ्यायच्या याचे नियम गुंतागुंतीचे आहेत. देशातील सध्याच्या नियमांनुसार त्रैमासिक निकाल जाहीर करताना ते स्टॅँडअलोन करायचे की कन्सॉलिडेटेड हे ऐच्छिक आहे, पण वार्षिक निकाल मात्र कन्सॉलिडेटेडच करावे लागतात. काही कंपन्या त्यामुळे त्रैमासिक निकाल स्टॅँडअलोनसाठी फक्त जाहीर करतात तर काही कन्सॉलिडेटेडसाठी. या कारणाने आपल्याला वेगवेगळ्या साइटवर वेगवेगळी आकडेवारी दिसते. कोणते निकाल हिशेबात घेतले आहेत त्याची म्हणूनच खात्री करून घ्यावी.


जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीचा 2012-13च्या वार्षिक अहवालानुसार तिच्या उपकंपन्या, असोसिएटेड कंपन्या, जॉइंट व्हेंचर इत्यादी सर्व मिळून त्या 47 वेगळ्या एंटीटी आहेत. बहुतेक उपकंपन्या या परदेशातील व्यवसायासाठी आहेत, पण या सर्व मिळून जे उत्पन्न व नफा मिळवतात त्याचा मूळ कंपनीच्या शेअरधारकांना लाभ होतोच. तसेच त्यांना तोटा झाला तर त्याचाही वाईट परिणाम होतो. जेएसडब्ल्यू स्टीलच्या अहवालानुसार दिसते तिचा 2012-13चा करोत्तर नफा स्टॅन्डअलोन हिशेबाने 1801 कोटी रुपये आहे तर कन्सॉलिडेटेड हिशेबाने 963 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ पॅरेंट कंपनीशिवाय इतर कंपन्यांपैकी काहींना तोटा झालेला आहे. त्यामुळे हिचा स्टॅँडअलोन ईपीएस 79.28 तर कन्सॉलिडेटेड ईपीएस 41.71 आहे आणि पीई अनुक्रमे 8.48 व 16.11 आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेताना आपण नेहमी कन्सॉलिडेटेड हिशेब लक्षात घ्यावा. स्टॅँडअलोनचे आकडे मूळ कंपनीची कामगिरी कशी आहे ते बघण्यासाठी जरूर लक्षात घ्यावेत, पण केवळ त्यावर विसंबून निर्णय घेणे योग्य नाही हे या उदाहरणावरून दिसेल.