आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वर्ष, नवे ट्रेंड : ‘स्टार्ट अप्स’ला बळकटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्समधील बड्या कंपन्यांनी केलेल्या कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांमुळे नुकतेच संपलेले वर्ष स्टार्ट अप्सना अर्थात छोट्या उद्योगांना ऑनलाइन आनंद देऊन गेले; पण नवीन वर्षात हा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. फ्लिप आणि स्नॅपमुळे अन्य गुंतवणूकदारांना नव्याने भांडवल आणण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे साहजिकच या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढून नवनवे स्टार्ट अप सुरू होण्याचा ट्रेंड नव्या वर्षात बघायला मिळणार आहे.

अधिकाधिक प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक असल्याने निधी उभारणी आता अधिक सोपी आणि जलद होणार आहे. परिणामी स्टार्ट अप्सला नवी बळकटी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढल्याने अधिकाधिक प्रमाणात नवीन स्टार्ट अप्स निर्माण होतील. दुसर्‍या बाजूला विद्यमान स्टार्ट अप्सना आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होऊन त्यांच्या व्हेंचर्सला आणखी वरच्या पातळीवर झेप घेता येणे शक्य होईल, असे मत ‘स्मार्टूर.कॉम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज जेवालकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये आणखी १०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडणार असल्याने ‘बी २ सी व्हेंचर्स’चे प्रमाण येणार्‍या काही महिन्यांत वाढणार असल्याचेही जेवालकर यांनी सांगितले. आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रोग्रेस सॉफ्टवेअरचे व्यवस्थापकीय संचालक रमेश लोगानाथन यांनीही ‘स्टार्ट अप्स’च्या वाढीला दुजाेरा देताना यंदाच्या वर्षात टेक्निकल स्टार्ट अप्सची नवी लाट आलेली बघायला मिळेल. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या बघितल्या, तर देशात स्टार्टअप क्षेत्राचे महत्त्व वाढत असल्याकडे लक्ष वेधले.

‘स्मॅक्ट’... नवे आकर्षण
आयटी क्षेत्र आता उत्पादनाशी निगडित नावीन्य आणण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत. त्यामुळे डिजिटल सोल्युशन्सवर भर देत या क्षेत्राची आगेकूच कायम राहणार आहे. नुकत्याच संपलेल्या वर्षात सोशल, मोबाइल, अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयोओटी) अर्थात ‘स्मॅक्ट'चे (SMACT) पर्व सुरू झाले. या वर्षातही हा ट्रेंड लक्ष वेधून घेणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टेलिकॉमची ट्रिंग ट्रिंग वाढणार
डेटा सर्व्हिसेसमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे अलीकडच्या तिमाहीत टेलिकॉम कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण सुधारले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मरगळ झटकली जाऊन टेलिकॉम उद्योगाच्या वाढीसाठी नवीन वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डेटा युजर्सची गुणात्मक आणि मूल्य स्वरूपातील वाढ हा या क्षेत्रासाठी नव्या वर्षातला महत्त्वाचा ट्रेंड ठरणार आहे.

- मोबाइल, क्लाऊड टेक्नॉलॉजी केंद्रस्थानी राहणार
- बहुतांश कंपन्यांचे क्लाऊड समीकरण जुळल्यामुळे आता क्लाऊडवर आधारित किंवा क्लाऊडशी निगडित अ‍ॅप्लिकेशन, क्लाऊड अ‍ॅनालिटिक्सचे महत्त्व वाढणार.