आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय या आघाडीच्या राष्ट्रीयीकृत बँकेने आपल्या पाच वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कालावधीच्या स्थानिक मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात पाव टक्क्याने कपात करून तो 8.50 टक्क्यांवर आणला आहे. त्याच वेळी पंजाब नॅशनल बॅँकेने (पीएनबी) मात्र आपल्या एक वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात पाव टक्क्यांनी वाढ करून तो 9 टक्क्यांवर नेला आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण आढाव्यात व्याजदराचा चकवा दिला, परंतु सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅँक ऑफ इंडियाने मात्र आपल्या गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदरात कपात करून ग्राहकांना सुखद धक्का तर दिलाच, पण बॅँकिंग क्षेत्रातही व्याजदर कपातीचे युद्ध छेडले आहे. एसबीआयने व्याजदरात कपात केल्यानंतर आता इतर बँकांही तसे पाऊल उचलतील, अशी शक्यता आहे.
एसबीआयच्या नव्या व्याजदराची अमलबजावणी 7 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. आता 15 लाख रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 8.75 टक्के आणि 15 लाख रुपयांपेक्षा जास्त पण एक कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 9 टक्के व्याज आकारले जाणार आहे. व्याजदरात करण्यात आलेला बदल हा केवळ नवीन कर्जासाठी लागू असेल. विद्यमान ग्राहकांसाठी विद्यमान व्याजदर कायम राहणार आहे. गृहकर्जावरील व्याजदरात 0.25 आणि 0.60 टक्क्यांच्या तर वाहन कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे.या नवीन व्याजदराची अंमलबजावणी 7 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. स्टेट बॅँकेचा किमान कर्ज दर 10 टक्के आहे. किमान कर्ज दर किंवा बेस रेट हा असा मापदंड असतो की त्या खालीच्या पातळीवर बॅँका कर्ज देऊ शकत नाहीत.
गृहकर्जाप्रमाणे वाहनांवरील कर्जदेखील कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सात वर्षे मुदतीच्या वाहन कर्जावर सध्याच्या 11.25 टक्क्यांच्या तुलनेत 10.75 टक्के व्याज द्यावे लागेल. त्यामुळे आता प्रत्येक एक लाख रुपयासाठी ग्राहकाला 1699 रुपयांचा (सध्या 1,725 रु.) किमान मासिक हप्ता भरावा लागेल. हा मासिक हप्ता सगळ्यात कमी असल्याचा दावा स्टेट बॅँकेने केला आहे. या व्याजदर कपातीमुळे ग्राहक 1 लाखाच्या रक्कमेवर वर्षाला 312 रुपयांची बचत करू शकणार आहे.
स्टेट बॅँकेने गृह कर्जाच्या व्याजदरात केलेली कपात ही विशेषत: अन्य बॅँकेकडून अगोदरच कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यातून कर्जाचे प्रीपेमेंट करण्याची पद्धत आता बंद झालेली असल्यामुळे अशा ग्राहकांना आपल्या तारणाची परतफेड करण्यासाठी कमी व्याजदराचा लाभ घेता येऊ शकणार आहे. साधारणपणे वर्षातल्या सध्याच्या काळात वाहनांची विक्री कमी असते, परंतु स्टेट बँकेने वाहन कर्ज स्वस्त केल्यामुळे वाहनांची मागणी थोड्या प्रमाणात वाढू शकते. पीएनबीच्या नव्या व्याजदराची अमलबजावणी गुरुवारपासून करण्यात आली आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एक वर्ष मुदतीच्या स्थानिक ठेवींवरील व्याजदर बँकेने 8.75 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर नेण्यात आला असल्याचे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. त्याचप्रमाणे एनआरई मुदत ठेवींवर देखील स्थानिक मुदत ठेवींप्रमाणेच 9 टक्के व्याजदर लागू असेल असेही बँकेने
म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.