आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफा मिळवण्यासाठी पोलाद कंपन्या निर्यात वाढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील मागणी मंदावलेल्या पोलाद कंपन्यांनी आता निर्यातीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. नफ्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी रुपयाच्या अवमूल्यनाचा चांगला फायदा या कंपन्यांना निर्यातीमुळे घेणे शक्य होणार आहे.

रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 60 पेक्षा पुढे गेल्यानंतर सेल, जेएसडब्ल्यू स्टील, एस्सार स्टील, आरआयएनएल यासारख्या काही कंपन्यांच्या निर्यात मागणीत गेल्या काही महिन्यांपासून चांगली वाढ झाली आहे. पोलाद निर्यातीचे जवळच्या काळातील चित्र चांगले असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एंजेल ब्रोकिंगचे धातू आणि खाण विभागाचे वरिष्ठ विश्लेषक भावेश चव्हाण यांनी रुपयाच्या अवमूल्यनामुळे पोलाद निर्यातीमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षात नेमकी निर्यात किती होईल, याचा विशिष्ट अंदाज ब्रोकरेज कंपनीकडे नसला, तरी मार्च अखेरपर्यंत 7 दशलक्ष टन पोलाद निर्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असल्याचे चव्हाण म्हणाले.

काही कंपन्यांच्या बाबतीत दुसर्‍या तिमाहीमध्येच निर्यात आकडेवारीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जेएसडब्ल्यूच्या निर्यातीमध्ये या कालावधीत 23 टक्क्यांनी वाढ होऊन ती 8,40,000 टनांवर गेली आहे. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी शेषगिरी राव यांनी दुसर्‍या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर करताना चालू आर्थिक वर्षात तीन दशलक्ष टन पोलाद निर्यात करण्याचा इरादा व्यक्त केला.

जेएसडब्ल्यू स्टील आणि एस्सार स्टील अशा काही विशिष्ट कंपन्यांबाबत सांगायचे, तर या कंपन्यांची निर्यात अनुक्रमे जवळपास 3 दशलक्ष टन आणि 1.5 ते 2 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे यंदा टाटा स्टीलची पोलाद निर्यात 0.2 दशलक्ष टन, सेलची 0.7 दशलक्ष टन होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

या अगोदर सार्वजनिक क्षेत्रातील आरआयएनएल या कंपनीने 2016-17 या वर्षासाठी एक दशलक्ष टन निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.