आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयच्या नीतीमत्तेचे धडे युरोपातील बँकेने गिरवले पाहिजे - स्टीफन बेनेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जगभरातील मध्यवर्ती बँकांनी भारतीय रिझर्व बँकेने कठीण आर्थिक स्थितीच्या काळात उचललेल्या पावलाबाबत समाधान व्यक्त केले असून अमेरिका तसेच युरोपातील बँक आणि वित्तसंस्थांनी या वित्तीय नीतीमत्तेचे धडे गिरवायला हवेत असे मत ब्रिटनच्या इन्स्पिरेशनल डेव्हलपमेंट ग्रुपचे (आयडीजी) मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेनेट यांनी व्यक्त केले. कॉर्पोरेट फायनान्सपेक्षा लोक आणि त्यांची संस्कृती अधिक महत्वाची आहे हे यातून दिसते असे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट फायनान्स या विषयातील गाढा अनुभव असलेले बेनेट यांनी लष्करी शिस्त, औद्योगिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रातील चापल्य या तिन्हीचा एकत्रित वापर करून नवे व्यवस्थापकीय नेते कसे तयार करता येतील याचा अभ्यास केला आहे. तसेच त्या आधारावर काही प्रारूपे आणि प्रशिक्षण सुविधा भारतात सुरु केली आहे. सध्या त्यांची संस्था बार्कलेज, एचएसबीसी या सारख्या बहुराष्ट्रीय उद्योगातील व्यवस्थापकांना प्रशिक्षण सेवा देते. यासेवा ब्रिटनमधून देण्यापेक्षा भारतात कार्यालय सुरु करून देणे चांगलेच किफायतशीर ठरते असे नमूद करून ते म्हणाले की अमेरिका आणि युरोपात आलेल्या आर्थिक आणि वित्तीय संकटाला तेथील बँका, वित्त संस्थांचा स्वार्थी दृष्टीकोन कारणीभूत आहे. एकेकाळी सावधपणे काम करणाऱ्या, कडक शिस्त पाळणाऱ्या या संस्था अचानक पैशाच्या मागे धावू लागल्या आणि संकटात सापडल्या. कॉर्पोरेट फायनान्स विशिष्ट मर्यादेपर्यंत समजू शकते मात्र वित्त संस्थांच्या मुलभूत चौकटीला जेव्हा धक्का बसतो तेव्हा कुठेतरी चुकते आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतीय वित्तीय व्यवस्थेत असलेली नैतिक मुल्ये म्हणूनच दिशा देणारी आणि दीर्घकाळाचा विचार करणारी आहेत.

लंडन विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही एमएससी (लीडरशिप डेव्हलपमेंट) हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम विकसित केला असून मुंबई विद्यापीठ, आय आय टी यांनी त्याबाबत आमच्याकडे विचारणा केली आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

ब्रिटन रॉयल मिलिटरी अकादमीत येणारे युवक आयडीजीमधील तज्ञ लोकांकडून गेली दहा बारा वर्षे प्रशिक्षण घेत आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की आम्ही सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, तसेच युरोपातील अनेक देशातील बहुराष्ट्रीय उद्योगांच्या अधिकारी वर्गाला आणि सरकारी संस्थाना नेतृत्वगुण कसे वाढवावे याचे प्रशिक्षण देत आहोत. भारतातील विद्यापीठे आणि उद्योगांशी त्याबाबत सहकार्य करणार आहोत. त्यासाठी देशातील केंद्र पुण्यात स्थापन केले आहे.
केवळ उद्योग नव्हेत तर इंग्लंड रग्बी संघ, १९ वर्षाखालील क्रिकेट संघातील खेळाडूंना विकास आणि सांघिक कौशल्य याविषयी आम्ही प्रशिक्षण देतो.

धोनीची नेतृत्व क्षमता उत्तम

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता उत्तम आहे असे कौतुकाचे उद्गार काढून स्टीफन म्हणाले की मला त्यांचा खेळ आणि शांत स्वभाव आवडतो. सचिन तेंडूलकर हा तर सर्वश्रेष्ठ आहे. मात्र वेस्ट इंडिजचा लोइड, गार्नर, रोबर्ट हा सत्तरीच्या दशकातील जो संघ होता तो दर्जा आता पाहायला मिळत नाही. भारताच्या संघाला कौशल्य वाढीचे प्रशिक्षण द्यायला आम्हाला आवडेल.