आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stock Market News In Marathi, Business, Economics

स्टॉक्स: आता नजर आयआयपी, महागाईच्या आकड्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रात नव्याने सत्तेत आलेल्या एनडीए सरकारकडून अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्याची अपेक्षा आणि सकारात्मक वातावरण यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी आली. फंड तसेच गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. सरकार लवकरात लवकर आर्थिक सुधारणेची पावले टाकेल, अशी यांची अपेक्षा आहे. यात माल व सेवा कर (जीएसटी) व प्रत्यक्ष कर संहिता (डीटीसी) यांच्यासह अनेक सुधारणा अपेक्षित आहेत. ही सर्व प्रकरणे अनेक वर्षांपासून संसदेत प्रलंबित आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोदी सरकारने तयार केलेला अ‍ॅक्शन प्लॅन बाजाराला पसंत पडला आहे. मात्र पाऊसमान कमी राहण्याची शक्यता, जागतिक अर्थव्यवस्थेतील मरगळीची स्थिती, महागाई वाढीचा कल आदी कारणांमुळे चिंता आहे. या घटकांनी आर्थिक चक्राला गती देण्याच्या महसुली आणि मौद्रिक उपाययोजनांची उपयुक्तता मर्यादित केली आहे. तरीही व्यापक दृष्टीने पाहिल्यास बाजारातील सकारात्मक कल कायम आहे. आगामी काळातही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आता बाजाराला नजर औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी), मे मधील ठोक व किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीची प्रतीक्षा आहे. येत्या काही दिवसांत हे आकडे जाहीर होणार आहेत. औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीकडून फारशा अपेक्षा नाहीत. याचे आकडे निराशाजनक राहण्याचीच शक्यता जास्त आहे. संकेतासाठी महागाईच्या आकडेवारीवर बाजाराची बारकाईने नजर राहील. महागाईचे आकडे घसरले तर आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवरून मिळणारे संकेतही सकारात्मक आहेत. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी चांगली आली असून हे तेथील अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की अमेरिका फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत कपात योजनेला गती देईल. हा घटक जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम करणारा आहे. असे असले तरीही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा जगातील अर्थव्यवस्थांसाठी नेहमीच सकारात्मक संकेत देणारी असून डी जोन्स आणि एस अँड पी 500 निर्देशांक या आठवड्यात नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. युरो झोनमधूनही अपेक्षित वृत्त येत आहे.

तांत्रिकदृष्ट्या मागील आठवड्यातील फंडांकडून झालेल्या जोरदार खरेदीनंतर आता शेअर बाजार कन्सॉलिडेशनच्या मूडमध्ये आला आहे. सध्या निफ्टी निर्देशांकही महत्त्वाच्या आधार पातळीपेक्षा खूप उंचीवर आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक कल राहण्याची शक्यता आहे. तरीही बाजारात आणखी वाढ येण्यापूर्वी कन्सॉविडेट होण्याची शक्यता आहे आणि मागील काही सत्रांत मिळवलेली वाढ कमी झालेली आहे. याचाच अर्थ असा की, बाजारात तांत्रिक करेक्शनची शक्यता आहे. अशात निफ्टीला खालच्या दिशेने 7565 वर चांगला आधार मिळणार आहे. या पातळीवर व्हॉल्यूमसह घसरणी झाल्यास पुढील आधार 7427 वर मिळेल. घसरणार्‍या निफ्टीसाठी ही पातळी काही प्रमाणात चांगला आधार ठरणार आहे. खालच्या पातळीवर काही प्रमाणात खरेदी होऊन निफ्टीत बाउंस बॅक दिसून येईल. ही पातळी तुटल्यास निफ्टीला 7363 वर चांगला आधार आहे.

वरच्या दिशेने निफ्टीला 7671 वर अडथळा आहे. हा पातळी पार करण्यासाठी निफ्टीत एक छोटी आणि स्मार्ट रॅली दिसून येईल. ही तेजी निफ्टीला 7729 ते 7757 या कक्षेत पोहोचू शकते. एक चांगले कन्सॉलिडेशन आणि करेक्शनशिवाय निफ्टी हा स्तर पार करू शकेल, असे मला वाटत नाही.

या शेअर्सकडे ठेवा लक्ष
समभागांच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी बँक लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आदी चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसी बँकेचा बंद भाव 816.65 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 834 रुपये आणि स्टॉप लॉस 798 रुपये आहे. एम अँड एम चा बंद भाव 1233.15 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1257 रुपये आणि स्टॉप लॉस 1204 रुपये आहे, तर जेएसडब्ल्यू स्टीलचा मागील बंद भाव 1310.90 रुपये आहे, तर त्याचे पुढील लक्ष्य 1334 रुपये आणि स्टॉप लॉस 1286 रुपये आहे.

- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
(vipul.verma@dainikbhaskargroup.com)