आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stopped Strike, Otherwise Production Moves To Aurangabad Rajiv Baja

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संप मिटवा, नाही तर उत्पादन औरंगाबादला हलवू; बजाज यांची कामगारांना तंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्याच्या चाकणमधील बजाज ऑटोमध्ये सुरू असलेला संप आठवडाभरात मिटला नाही तर उत्पादन औरंगाबादेतील प्रकल्पात हलवावे लागेल, असा स्पष्ट इशारा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यवस्थापन व कामगार संघटनांना दिला आहे. कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे गेल्या 42 दिवसांपासून चाकण प्रकल्पातील उत्पादन ठप्प आहे.

बजाज म्हणाले की, चाकण प्रकल्पातील संपावर आठवडाभरात तोडगा न निघाल्यास कंपनीला किमान 50 टक्के उत्पादन व उत्पादन क्षमता औरंगाबाद व पंतनगरच्या प्रकल्पांत स्थलांतरित करावे लागेल. याबाबत आपण कंपनीच्या संचालक मंडळाची भेट घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र, चाकण प्रकल्प पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. संशोधन व विकासाचे मुख्य काम येथेच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विक्री घसरल्याने चिंता : जुलैतील वाहन विक्रीच्या आकडेवारीत बजाज तिसर्‍या स्थानावर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राजीव बजाज म्हणाले की, विक्रीच्या बाबतीत दुसर्‍या सहामाहीत आता कंपनी तडजोड करणार नाही.

यामुळे उत्पादन इतर ठिकाणच्या प्रकल्पांत स्थलांतरित करण्याबाबत कंपनी आपल्या संचालक मंडळाची परवानगी घेणार आहे. कर्मचार्‍यांच्या अवाजवी मागण्यांवर आम्ही आतापर्यंत शांत होते. मात्र, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून पुढील आठवड्यात तो घेतला जाईल, असे बजाज म्हणाले.

संपकर्‍यांच्या प्रमुख मागण्या : बजाज ऑटोच्या चाकणमधील प्रकल्पांतील कर्मचारी 25 जून 2013 पासून संपावर गेले आहेत. घसघशीत पगारवाढ किंवा प्रत्येकाला 500 ‘इसॉप्स’ शेअर्स देणे आणि काढलेल्या कर्मचार्‍यांना विनाअट कामावर घेणे आदी कर्मचार्‍यांचा प्रमुख मागण्या आहेत.

औरंगाबादेत 1000 वाहनांचे उत्पादन : चाकणमधील संपामुळे कंपनीला औरंगाबादेतील वाळूज प्रकल्पात काही उत्पादन स्थलांतरित करावे लागले आहे. सध्या येथून दररोज सुमारे 1 हजार वाहनांचे उत्पादन केले जात आहे.

22 पैकी 7 जणांना कामावर घेण्याची तयारी : कामावरून काढून टाकण्यात आलेल्या 22 पैकी सात कर्मचार्‍यांना पुन्हा घेण्याची तयारी बजाज व्यवस्थापनाने दर्शवली आहे. या सात जणांविरुद्ध चौकशी न करता किरकोळ तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 15 कर्मचार्‍यांवरील तक्रारींचा तपास करण्यासाठी कंपनी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करणार आहे. या संदर्भात र्शमिक एकता महासंघ या संपकरी कर्मचारी संघटनेसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती बजाज यांनी दिली.