आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story: Santosh Kale's Artical On Sanjay Gaonkar

यश कथा: अंधकारातून तेवला व्यवसायाचा तेजोदीप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात अचानक कधीतरी असे वळण येते, सारे संपल्यासारखे वाटते. दु:खाच्या खाईत स्वत:चाच कडेलोट केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. पण नैराश्याच्या या अंधकारातही निग्रहाचा अगदी इवलासा किरण असला तर अंधत्व असूनही प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपल्या उद्योगात 12 कोटींच्या उलाढालीचा झगमगाट मनाच्या डोळ्यांनीही अनुभवता येऊ शकतो हे दाखवून दिलेय ते कळव्यातील 39 वर्षांचे तरुण अंध उद्योजक संजय गावकर यांनी.
अंधत्वावर मात :
मुळातच हुशार असलेल्या संजय गावकर यांनीही भविष्यातील सुखस्वप्नांची चित्रे रंगवत ऐरोलीच्या दत्ता मेघे महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी प्रथम दर्जाने संपादन केली. सैन्यदलात असलेले गावकर यांचे वडील एक- दोन वर्षांत निवृत्त होण्याच्या मार्गावर असल्याने जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर येणार होती. वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांना डोळ्याचा त्रास सुरू होता. पण तो इतके गंभीर वळण घेईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. डोळ्याची दृष्टी हळूहळू क्षीण होत जाऊन कायमचे अंधत्व येणा-या रेटिना प्रिग्मेंटिस या दुर्धर आजाराने त्यांच्या आयुष्यावर अचानक घाला घातला आणि कायमचा अंधार झाला. अनेक नेत्रतज्ज्ञांना दाखवूनही त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्महत्येचा विचारही मनात डोकावून गेला. अखेर त्यांच्याच एका डॉक्टर मित्राने संजय गावकर यांना ‘नॅब’ अंधशाळेत जाण्यास सांगितले. ‘नॅब’मधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शाळेतील अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेतले. काही जणांनी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करण्याचाही सल्ला त्यांना दिला. पण नोकरीच्या मागे न लागता मेकॅनिकल वर्कशॉप टाकायचा विचार त्यांनी अगोदरच केला होता. ‘नॅब’च्या आर्थिक मर्यादांमुळे त्यांना तेथून भांडवल मिळू शकले नाही. त्यानंतर मग अपंगांना मिळणा-या सवलतींच्या शोधात त्यांनी महाराष्‍ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाकडून म्हशी पालन व्यवसायासाठी कर्ज घेतले. परंतु अभियांत्रिकी क्षेत्रातील गावकर यांना हा व्यवसायही पटला नाही. जीवनातील सात वर्षे त्यांच्यासाठी अतिशय कष्टप्रद गेली. शेवटी वडील म्हणाले की, आपण गावाला जाऊ, घर बांधू आणि तेथेच राहून काहीतरी करू. पण गावकर यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडायची नाही असा निश्चय केला. उलट अभियांत्रिकीचे कसब वापरून त्यांनी स्वत:च वडिलांना टुमदार घर बांधून दिले. या घराच्या बांधकामाने त्यांच्या उद्योजकीय आत्मविश्वासाला खरी उभारी मिळाली. मग गावकर यांनी त्यांचा इंजिनिअर मित्र अतुल माळोदे यांची मदत घेऊन सिद्धकला इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली.
गावकर आणि त्यांना गेली दहा वर्षांपासून साथ देणारे अतुल माळोदे या दोघांसाठी हा पुरस्कार ख-या अर्थाने तेज:पुंज ठरणार :
व्यवसायाचा विकास कसा होईल याचा सतत मनाशी ध्यास असलेले गावकर हे आपला आवाज, बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि चातुर्य या बळावर मार्केटिंगमध्ये निष्णात झाले. स्वस्थ बसून राहण्याचा स्वभाव नसल्याने ते फिरून छोटी कामे मिळवत. एक वेगळे उदाहरण द्यायचे तर गॅमन इंडियाच्या उपाध्यक्षांशी दूरध्वनीवरून मार्केटिंग करून त्यांनी तीन कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले. गावकर हे अंध आहेत याचा गंधही त्यांना नव्हता. या कंत्राटाला अंतिम स्वरूप देण्यासाठी गॅमनच्या कार्यालयात गेल्यावर आपल्याशी बोलणारे गावकर हे अंध आहेत हे समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. पण तरीही त्यांनाच ते कंत्राट मिळाले. व्यवसायाच्या सुयोग्य नियोजनाच्या बळावर गावकर या कंपनीमार्फत मोठे मोठे ट्रंकी प्रोजेक्ट घेतात. चीनमधील एका कंपनीच्या सहकार्यातून त्यांनी ‘एसीआय स्टोअरेज व्हॅक्यूम सिस्टिम’ ही आणखी कंपनी सुरू केली असून ती गोदामांमध्ये साठवणुकीसाठी मोठे मोठे रॅक्स उपलब्ध करून देते. अगदी दोन महिन्यांपूर्वी त्यांनी भिवंडी येथे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करून सिद्धकला बॅरल्स प्रा.लि. ही कंपनी सुरू केली आहे. रासायनिक आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांना पिंपे पुरवण्याचे काम ही कंपनी करते. 45 कर्मचारी आणि 100 कामगारांच्या बळावर गावकरांच्या व्यवसायाची उलाढाल आता 12 कोटी रुपयांवर गेली आहे. डोळस उद्योजकांनाही अचंबित करणा-या संजय गावकरांचा उद्योग व्यवसायाच्या नंदादीपाचा प्रकाश आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अंध उद्योजकतेसाठी यंदाच्या वर्षीच्या राष्‍ट्रीय पुरस्कारासाठी गावकर यांची निवड झाली आहे. तीन डिसेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणा-या कार्यक्रमात राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गावकर आणि त्यांना गेली दहा वर्षांपासून साथ देणारे अतुल माळोदे या दोघांसाठी हा पुरस्कार ख-या अर्थाने तेज:पुंज ठरणार आहे यात शंका नाही.