आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगी जिद्द, चिकाटी आणि आहे त्या परिस्थितीवर मात करण्याची धमक अंगात असेल तर साध्या चाळीतल्या दहा बाय दहा खोलीतला व्यवसाय आठशे चौरस फुटाच्या वर्कशॉपपर्यंत जाऊ शकतो. इतकेच नाही तर अगदी दहा - पंधरा हजार रुपये असलेली उलाढालही दीड कोटीच्या घरात जाऊ शकते हे सिद्ध करून दाखवलेय ते महेंद्र पाटील या 36 वर्षांच्या तरुणाने.
परळच्या डिलाइल रोडवरील चाळीत राहणार्या पाटील कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच. वडील गिरणी कामगार, आई अशिक्षित, बारावीपर्यंत शिक्षण झालेला मोठा भाऊ दीपकचा छोटासा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय. गिरणी बंद पडल्यावर आई- वडिलांनी प्रसंगी खानावळीत जेवण घालून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. धाकटा मुलगा महेंद्र बीकॉम, मग एमकॉम झाला. चांगले शिक्षण झाल्यामुळे महिंद्रला एका मोबाइल कंपनीत मार्केटिंगची नोकरी मिळाली. पण कामाचा ताण खूप होता. त्या वेळी मोठय़ा भावाचा वॉकमनसाठी अँडप्टर बनवण्याचा छोटेखानी व्यवसाय होता. परंतु नंतर आलेल्या ‘एफएम’ वाहिन्यांच्या लाटेत हा व्यवसाय जवळपास वाहून गेला. पण इलेक्ट्रॉनिक्सचा घरचा अभ्यास आणि नोकरीतील मार्केटिंगच्या अनुभवाच्या बळावर आपल्या मोठय़ा भावाला ऑर्डर आणून देण्याची मदत त्याने सुरू केली. सकाळी नोकरी आणि दुपारच्या वेळेत ऑर्डर आणणे असे रुटीन सहा महिने चालले. मग मात्र महिंद्रने नोकरीला रामराम करीत थेट उडी घेतली ती लिफ्टसाठी लागणार्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या व्यवसायात. या व्यवसायात चांगली संधी असल्याचे ओळखून त्याने त्याप्रमाणे जवळपासच्या कंपन्यांचा शोध घेतला. अखेर शिवडी येथील इरॉस नावाची कंपनी मिळाली. लिफ्टसाठी आवश्यक असलेले ट्रान्सफॉर्मर उपकरण सॅम्पल म्हणून कंपनीने बनवण्यासाठी सांगितले. या कंपनीच्या खूप वेळा पायर्या झिजवल्यावर खर्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. पैशाची चणचण सोन्याचे दागिने गहाणे ठेवून दूर केली. पण कंपनीची मोठी ऑर्डर त्यांच्या पुढच्या आर्थिक वर्षात मिळाली. उत्पादने बनवून देताना कंपनीच्या वर्कशॉपमध्ये काम कसे चालते हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून महिंद्रने वायरिंग व इतर गोष्टीही जाणून घेतल्या. पुढे कामगारांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर कंपनीने सर्व उत्पादनांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला व आकाश इलेक्ट्रॉनिक्सचीच निवड केली. मग महिंद्र यांच्याकडे डिजिटल कंट्रोलर किट बनवण्याचे पूर्ण काम आले. डिजिटल कंट्रोलर बनवण्याची क्षमता असली तरी पुन्हा इतक्या मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करणार कशी, हा प्रश्न होताच. पण प्रसंगी इरॉस कंपनीनेच त्याला आर्थिक पाठबळ दिले. कारण एक कंट्रोलर बनवण्याचा खर्च 30 ते 40 हजार रुपये होता. 2007 मध्ये कंपनीने 22 लाखांची पहिली ऑर्डर दिली आणि नंतर ती वाढतच गेली. आज महिंद्र पाटील हे लिफ्टसाठी 20 उत्पादनांची निर्मिती करीत असून उलाढाल दीड कोटींच्या वर गेली आहे. इतकेच नाही तर आराम बसमधील टीव्हीसाठी लागणार्या इनव्हर्टरचा जोड व्यवसायही त्यांनी सुरू केला आहे. नीता ट्रॅव्हल्स, चिराग ट्रॅव्हल्स, कराड, सातारा, सांगली, कोकणात जाणार्या आराम गाड्यांमध्ये त्यांनी इन्व्हर्टर बसवले आहेत. मोठय़ा बंधूंकडे मालकी आणि स्वत:कडे खरेदी आणि मार्केटिंगचे व्यवस्थापन याची योग्य सांगड घातल्यानेच आज ‘आकाश इलेक्ट्रॉनिक्स’ला यशस्वी उद्योजकतेचे आकाश खर्या अर्थाने खुले झाले आहे, असे म्हणता येईल.
यांच्या यशाची गुरुकिल्ली
गोड बोलणे, रागावर नियंत्रण, माणसांची योग्य पारख, आहे त्या परिस्थितीत योग्य मार्ग शोधणे, अनुभव- ज्ञानाचा व्यवसायात खुबीने वापर, जिद्द, चिकाटी, स्थितीवर मात करण्याची धमक.
kalesantosh70@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.