आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांच्या तोंडावर साखर महागणार, केंद्रीय उत्पादन मंडळाकडून अधिसूचना जारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली. मंगळवारी झालेल्या या शुल्कवाढीमुळे साखरेवरील आयात शुल्क 10 वरून 15 टक्के झाले आहे. सरकारने उचललेल्या या पावलामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र साखर महागाईचा कडू डोस पचवावा लागणार आहे. आयात शुल्कवाढीनंतर घाऊक बाजारात साखरेचे भाव क्विंटलमागे 10 रुपयांनी वधारले.


साखर कारखान्यांना ऊस देणा-या शेतक-यांची कारखान्यांकडे 9000 कोटी रुपये थकबाकी आहे. कारखानदारांना हे पैसे फेडता यावेत यासाठी आयात शुल्कात वाढ केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाकडून (सीबीईसी) जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कच्च्या तसेच रिफाइंड साखरेवरील आयात शुल्क वाढवून 15 टक्के करण्यात आले आहे. साखरेच्या आयातीमुळे देशातील बाजारात साखरेच्या भावात मंदी होती.


त्यामुळे साखर कारखान्यांना शेतक-यांचे पैसे फेडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले.
उत्तर प्रदेशातील अनेक कारखाने घाऊक व्यापा-यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत साखरेची विक्री करत आहेत. अर्थमंत्री पी. चिदंबरम, कृषिमंत्री शरद पवार तसेच अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांच्यात आयात शुल्काबाबत 4 जुलै रोजी बैठक झाली होती.


शुल्कवाढीची कारणे
साखरेच्या आयातीला आळा बसवणे आणि देशातील बाजारेपेठेत साखरेच्या भावातील मरगळीच्या वातावरणावर अंकुश ठेवणे या दोन प्रमुख उद्देशांनी साखरेवरील आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.


सध्याचे भाव
दिल्लीत सध्या सुटी साखर 40 रुपये किलो, मुंबईत 36 ते 37 रुपये किलो या भावाने विक्री होत आहे. औरंगाबादेत किरकोळ बाजारात सुटी साखर 32 ते 35 रुपयांनी विक्री होत आहे.


साखर शेअर्सचा गोडवा वाढला
साखरेवरील आयात शुल्कात वाढ केल्याने साखर उद्योगाशी निगडित कंपन्यांच्या समभागांत तेजी आली. द्वारकेश शुगरचे समभाग 7.39 टक्क्यांनी वाढले. शक्ती शुगरचे समभाग 4.97 टक्के, बलरामपूर चिनी 4.59 टक्के धामपूर शुगर्स 3.74 टक्के, बजाज हिंदुस्तान 2.68, त्रिवेणी इंजिनिअरिंग 1.64 टक्के आणि रेणुका शुगर्सचे समभाग 1.17 टक्क्यांनी वधारले.
पुढे काय
साखरेवरील आयात शुल्कात पाच टक्के वाढ केल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महागणार आहे.