आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील उसाचे उत्पादन यंदा घटण्याची अपेक्षा आहे. परिणामी ऑक्टोबरपासून सुरू होणा-या हंगामामध्ये देशातील साखरेचे उत्पादन पाच टक्क्यांनी घटून ते 23.7 दशलक्ष टनांवर येण्याचा अंदाज ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ने (इस्मा) व्यक्त केला आहे.
देशातील 22 ते 22.5 दशलक्ष टन मागणीच्या तुलनेत 2013-14 विपणन वर्षात 23.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. ऊस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला बसलेल्या दुष्काळी तडाख्याचा विपरीत परिणाम जाणवणार आहे. दुष्काळामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ जवळपास 12.5 टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याने ऊस अपु-या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने त्याचा एकूण साखरेच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. इस्माने ऊस लागवडीची उपग्रहाच्या मदतीने छायाचित्रे घेतली असून त्याच्या आधारावर देशातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘इस्मा’च्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे मागील वर्षातील 5.23 टक्क्यांच्या तुलनेत ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ 1.52 टक्क्यांनी घटून ते 5.15 दशलक्ष हेक्टर्सवर येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात उसाची जवळपास 4 हजार कोटी रुपयांची थकबाकी असतानादेखील या राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ऊस लागवड 3.1 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशबरोबरच हरियाणा, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील ऊस लागवडीमध्येदेखील सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
शुल्कवाढ अपुरीच : साखरेवरील आयात शुल्कात किमान 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची साखर उद्योगाकडून सरकारला वारंवार विनंती करण्यात येत आहे; परंतु आयात शुल्क केवळ 5 टक्क्यांनी वाढवून ते 15 टक्क्यांवर नेण्यात आले आहे. ही वाढ अपुरी आणि खूप उशिरा झाली असल्याचे मत ‘इस्मा’ने व्यक्त केले आहे.
आयात शुल्क 30 ते 40 टक्के असावे
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती घसरल्या असल्याने आयात अद्याप शक्य आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाले असला तरी दुस-या बाजूला ब्राझीलच्या चलनाचेदेखील अवमूल्यन झाले आहे. देशात साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे साखरेच्या आयातीवर संपूर्ण नियंत्रण आणण्यासाठी या शुल्कात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होणे गरजेचे असल्याकडेही ‘इस्मा’ने लक्ष वेधले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.