आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इक्राचा अहवाल- ऐन सणासुदीत साखर महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मागणी जास्त आणि पुरवठा कमी व महागाईची हमी या समीकरणाचा फटका साखरेच्या गोडीला बसणार आहे. पुरवठ्याअभावी ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा टनामागे 1000 रुपयांनी महागणार असल्याचा अंदाज इक्रा या संस्थेने व्यक्त केला. गाळपाच्या हंगामाची सांगता, साखरेच्या आयात शुल्कातील वाढ आणि पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त यामुळे येत्या काही दिवसांत साखर महाग होईल, असे इक्राने अहवालात म्हटले आहे.
इक्राच्या अहवालानुसार, जुलैअखेर ठोक बाजारात साखरेचे भाव टनामागे 31 हजार रुपये (31 रुपये किलो, एक्स-मिल) आहेत. यंदाच्या हंगामात (आॅक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2013) आयात साखर गृहीत धरून 23 ते 23.5 दशलक्ष साखरेचा पुरवठा अपेक्षित आहे. मागणीपेक्षा पुरवठा किंचित जास्त राहील. मात्र, पुढील हंगामाच्या प्रारंभी (आॅक्टोबर 2013) साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रमुख ऊस पट्ट्यातील दुष्काळाचा परिणाम जाणवणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2013-14 या वर्षातील साखर उत्पादनाचे भाकीत एवढ्या लवकर व्यक्त करणे शक्य नसल्याचे इक्राने स्पष्ट केले. सध्या देशात 6.5 ते 7 दशलक्ष टन साखरेचा साठा आहे. आगामी तीन महिन्यांतील मागणी यातून भागवता येईल. चालू हंगामात साखरेच्या किमती सरासरी कमी राहिल्याने साखर कारखान्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. 2012-13 हंगामाच्या
तिसर्‍या तिमाहीत कारखान्याच्या साखरेला तुलनेत जास्त भाव मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दुष्काळाचा फटका :
देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्ये ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र, गतवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांना दुष्काळाचा फटका बसला. मुख्यत: महाराष्ट्राला याची जास्त झळ बसली. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.