आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युलिप पॉलिसी घेण्यापूर्वी सर्व अटी, नियम लक्षात घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनिट लिंक्ड विमा पॉलिसी अर्थात युलिपबाबत तुम्ही बर्‍याचदा ऐकले असेल की, या पॉलिसी चुकीच्या पद्धतीने ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. युलिपमध्ये आयुर्विमा, करबचत आणि संपत्ती निर्माण अशा सुविधा एकाच वेळी मिळत असल्याने असे होते. युलिपबाबत सखोल माहिती घेतल्यास आणि या पॉलिसी अल्पकाळासाठी न घेतल्यास हे तिन्ही लाभ तुम्हाला मिळवता येतील.

फ्रंट एंड कॉस्ट : पहिल्या पाच वर्षांतील प्रीमियमचा मोठा भाग विमा कंपन्यांकडून फ्रंट एंड खर्चासाठी कपात केला जातो, हे बर्‍याच गुंतवणूकदारांना माहिती नसते. याची निश्चित टक्केवारी नसते. तरीही याचे प्रमाण 40 टक्क्यांपासून ते कमाल 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ, समजा एखाद्याने युलिप पॉलिसी घेतली तर त्याच्या पहिल्या वर्षीच्या 50 हजार रुपयांच्या हप्त्यातील 20 ते 25 हजार रुपये फ्रंट एंड कॉस्टच्या रूपात कपात केले जातात. आयुर्विमा संरक्षणाच्या मूल्यापोटी ही रक्कम कपात केली जाते. त्यामुळे गुंतवणुकीच्या पारड्यात खूपच कमी रक्कम राहते.

विविध फंडांचे पर्याय : यात पॉलिसी घेणार्‍याला आपल्या गरजेनुसार विविध फंडांतील वेगवेगळ्या असेट अलोकेशनमध्ये गुंतवणुकीचा पर्याय असतो. ज्याद्वारे विविध इक्विटी, बॅलन्स्ड आणि डेट फंडात गुंतवणूक करून एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करता येतो. ज्यात समजा एखाद्या श्रेणीने (असेट) परतावा कमी दिला तर त्याची भरपाई दुसर्‍या असेटने दिलेल्या चांगल्या परताव्याद्वारे होऊ शकते. पॉलिसीधारकाला यात धोरण आखण्याचे, बदलण्याचे स्वातंत्र्य असते. यामुळे बदलत्या आर्थिक स्थितीमध्ये एखाद्या विशिष्ट असेटच्या किमतीत होणार्‍या चढ-उताराचा लाभ घेता येतो.

बाजाराशी निगडित गुंतवणूक : म्युच्युअल फंडांप्रमाणेच युलिपमध्येही शेअर बाजार आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते. युलिप पॉलिसीधारकांनाही युनिट मिळतात आणि प्रत्येक युनिटची नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) असते. एनएव्ही दररोज जाहीर होत असते. युलिपमधील गुंतवणुकीत बाजारातील जोखीम असते. फंडांची कामगिरी आणि भांडवल बाजारावर परिणाम करणार्‍या घटकांमुळे युनिटची किंमत कमी-जास्त होऊ शकते. आपल्या निर्णयासाठी पॉलिसीधारक जबाबदार असतो. केवळ इक्विटीच नव्हे तर डेटमधील हिश्श्यातही मूल्य कमी होण्याची शक्यता असते.

आयुर्विमा संरक्षण : मोठ्या प्रमाणातील विमा संरक्षणासाठी एखाद्या शुद्ध टर्म विमा पॉलिसीप्रमाणे युलिप पॉलिसी स्वस्त नसते. मात्र एकाच उत्पादनात सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न युलिपमध्ये दिसून येतो.

वैशिष्ट्ये जाणून घ्या : तुम्हाला एकाच उत्पादनात अनेक सोयी हव्या असतील तर अशा बंडल्ड उत्पादनासाठी किंमत मोजावी लागते. विमा विक्री करणारे एजंट यावरील आकर्षक व निश्चित परताव्याचे आमिष दाखवतात. विमा कंपनी मात्र असे कोणतेही आश्वासन देत नाही.

याकडे ठेवा लक्ष : युलिप योजनेसाठीचा प्रस्ताव अर्ज स्वत: भरा. त्यात विमा कंपनीला अचूक माहिती द्या. पॉलिसीची कागदपत्रे मिळाल्यानंतर

ती व्यवस्थित वाचा. पूर्ण वाचणे शक्य नसेल तर किमान विम्याची रक्कम, प्रीमियम, भरपाईची पद्धत, पैसे भरण्याची पद्धत आणि पॉलिसीचा कालावधी समजून घ्या. हे वाचणे क्लिष्ट आणि कठीण वाटले तरी याचे वाचन फायद्याचे राहील.

लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
- सुरेश के. नरुला