आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या भविष्यासाठी चाइल्ड इन्शुरन्स योग्य आहेत का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलांनी चांगले शिकावे. चांगले जगावे, थाटामाटात त्यांची लग्ने व्हावीत, असे प्रत्येक माता-पित्याला वाटत असते. ही तीन उद्दिष्टेच त्यांची सर्वात मोठी वित्तीय जबाबदारी असते. मुलांच्या जन्माबरोबरच काही आई-वडील त्यांच्या मुलांचा विमा उतरण्याबाबत विचार करतात. सध्या ज्या प्रमाणात दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढतो आहे, विवाहाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे, महागाई गगनाला भिडली आहे. वाढती महागाई सर्वांची बचत स्वाहा करते आहे. त्यामुळे अनेक माता-पिता आपल्या मुलांच्या भवितव्याची उद्दिष्टे पूर्ण करू शकणार नाहीत.
विमाधारकांनी पालकांची हीच अडचण ओळखत मुलांसाठी अनेक चाइल्ड्स इन्शुरन्स योजना आणल्या आहेत. आपल्या मुलाच्या भविष्यातील महत्त्वाच्या खर्चासह जास्तीचे खर्च यातून भागतील असा दावा या योजनांतून करण्यात येतो. यातील काही चाइल्डकेअर बचत योजना, युनिट लिंक्ड एडोव्हमेंट प्लॅन (युलिप) प्रमाणे महाग पडतात. या प्रकारच्या बहुतेक प्लॅनवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, यातील बहुतेक प्लॅन पुरेसे विमा संरक्षणही देत नाहीत तसेच महागाईवर मात होईल असा परतावाही देत नाहीत.
कार, व्हेकेशनसारख्या वित्तीय गरजापूर्तीचा दावा अनेक चाइल्ड्स इन्शुरन्स प्लॅन करतात.मात्र या प्लॅनमुळे उच्च शिक्षण, थाटामाटात लग्न आदी खर्च पूर्ण झाल्याचे उदाहरण नाही. कारण बहुतेक विमा योजनांप्रमाणेच मुलांच्या विमा योजना कार्य करतात. त्यांचे असेट अलोकेशन थोडे वेगळे असते एवढाच काय तो फरक असतो. स्वत:चा प्लॅन स्वत: बनवा : विमा योजनेला जोडण्यात आलेल्या चाइल्ड या शब्दाच्या जाळ्यात पालकांनी अडकू नये. मुलाचा दुर्दैवी मृत्यू हे भावनात्मक नुकसान आहे वित्तीय नाही. त्यामुळे मुलांसाठी अशा पॉलिसी खरेदी करणे टाळायला हवे. त्याशिवाय एक चांगले वित्तीय नियोजन तयार करावे. त्यानुसार असेट एलोकेशन करावे.आपल्या सोयीनुसार योजना बनवताना आपल्या आर्थिक गरजांबरोबरच मुलांच्या आर्थिक गरजा लक्षात घ्याव्यात. त्यात मुलांचे वय, शिक्षण आणि लग्न यासाठी वेळोवेळी लागणा-या पैशांची गरज, अतिरिक्त संरक्षण, मॅच्युरिटी बेनिफिटस आदी बाबींचा समावेश आहे.
उदाहरणावरून समजून घ्या : सुजितला दोन वर्षांची एक मुलगी आहे. ती 18 वर्षांनंतर पदवीधर होईल. तिने अभियांत्रिकेचे शिक्षण घ्यावे असे सुजितला वाटते. आजच्या बाजारभावाप्रमाणे तिच्या पदवीपर्यंतचा खर्च पाच लाख रुपये आहे. दरवर्षी शिक्षणाचा खर्च वार्षिक 10 टक्के दराने वाढेल, असे गृहीत धरल्यास सुजितला मुलीला इंजिनिअरिंगला घालण्यासाठी 22.97 लाख रुपयांची गरज लागेल. जर त्याने महिन्याला 4209 रुपये बचत केली तर वार्षिक 12 टक्के परतावा गृहीत धरल्यास त्याला त्याचे लक्ष्य गाठता येईल.
समजा सुजितने एखादी पारंपरिक चाइल्ड विमा योजना निवडली तर त्याला इच्छित उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या खिशातून जादा 3016 रुपये खर्च करावे लागतील. कारण सध्या बहुतेक चाइल्ड इन्शुरन्स योजना वार्षिक सहा टक्के परतावा देत आहेत. अशा रीतीने सुजितच्या मुलीच्या भविष्यातील खर्चासाठी एक शुद्ध विमा टर्म प्लॅन घ्यायला हवा. त्याचा खर्चही कमी येतो. कुटुंबातील कमाई करणा-या प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुलांच्या भविष्यातील योजना धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे कोणतेही वित्तीय नियोजन करताना पुरेशा विमा संरक्षणाचा त्यात समावेश करावा.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.