आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांत एसयूव्हींचा बार फुसका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकांच्या प्रचारामध्ये धुरळा उडवत जाणार्‍या उमेदवारांच्या मोठ्या गाड्यांचा ताफा पाहिला की अप्रूप वाटते, परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये हे अप्रूप फारसे जाणवले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुका आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खर्चिक ठरणार असून बड्या वाहनांची विक्री सुसाट होणार, असा अंदाज होता; परंतु गंमत म्हणजे बोलेरो, स्कॉर्पिओ, इनोव्हा, फॉर्च्युनर आणि एंडेव्हरसारख्या एसयूव्हींकडे उमेदवारांनी सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या हंगामातील विक्रीला खो बसला आहे.

अगोदरच्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधील वातावरणाशी तुलना करता यंदाच्या निवडणुकांमध्ये एसयूव्ही आणि उपयोगिता वाहनांना फारशी पसंती मिळालेली नसल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे निवडणुकांच्या काळात या वाहनांची विक्री चांगली होते, असा अनुभव आहे; परंतु वाहन उद्योगाच्या आशा यंदाच्या निवडणुकीत मात्र धुळीला मिळाल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील एकूणच मरगळीचा अगोदरच वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एसएमएसचे विविध पर्याय तसेच सोशल मीडिया या दोन माध्यमांनी निवडणूक काळातील वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम केला आहे. कारण ही दोन्ही प्रभावी माध्यमे राजकीय उमेदवारांसाठी जास्त स्मार्ट ठरत आहेत.

एसएमएससारख्या आजच्या जमान्यातील प्रभाव माध्यमांमुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये एसयूव्ही आणि युटिलिटी वाहनांच्या विक्रीवर फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही; परंतु पूर्वीच्या वेळी मात्र या वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाली होती, असे ‘सियाम’चे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा परिणाम
यंदाच्या निवडणुकांत सोशल मीडिया हे नवे माध्यम प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक व अशा प्रकारच्या विविध माध्यमांतून मतदारांंशी फुकटात तसेच एसयूव्हींच्या तुलनेत नगण्य किमतीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. त्यामुळे एसयूव्हीसारख्या महागड्या पर्यायाकडे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे यंदाच्या निवडणुकीतील चित्र आहे.

मंदीचाही परिणाम
जागतिक आर्थिक मंदीमुळे (2008) वाहन बाजाराला मोठा फटका बसला होता. त्यामुळे 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एसयूव्ही आणि युटिलिटी वाहनांना फारशी मागणी आली नाही. सियामच्या आकडेवारीनुसार युटिलिटी वाहनांची विक्री याच वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यात 13.13 टक्क्यांनी घसरून ती 22,048 वाहनांवरून 19,151 वाहनांवर आली. मार्च महिन्यातही ही विक्री 8.64 टक्क्यांनी घटली होती. वाहनांच्या विक्री वाढीसाठी केवळ निवडणुकाच कारणीभूत आहेत असे नाही, तर आर्थिक वर्ष संपत असल्याने त्याचा परिणाम मार्चमधील विक्री वाढीवर होत असतो, असे मत रेनॉचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत सॉव्हने यांनी व्यक्त केले. महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे सीईओ पवन जोशी यांनी या मताला दुजोरा देताना वाहनांची ग्राहकांकडून विचारणा झाली, तरी त्याचे विक्रीत रूपांतर होऊ शकले नाही.