आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात स्पोर्टस युटिलिटी व्हेइकलवरील (एसयूव्ही) उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एसयूव्हीवरील उत्पादन शुल्क 27 टक्क्यांवरून 30 टक्के केले होते. त्यामुळे अनेक एसयूव्हीच्या किमती 15 ते 70 हजारांनी वाढल्या होत्या. आता या तरतुदीमध्ये बदल करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या एसयूव्हींची किंमत 12 लाखांहून जास्त आहे तसेच ज्या कारचे ग्राउंड क्लिअरन्स 200 एमएमपेक्षा जास्त आहे, अशा एसयूव्हींवरच वाढीव 3 टक्के उत्पादन शुल्काचा भार देण्याचा विचार आहे.
तसेच ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त आहे अशा एसयूव्ही वाढीच्या कक्षेत येणार आहेत. बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार चार मीटर लांबीच्या, 1500 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता आणि 170 एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणा-या कार एसयूव्ही श्रेणीमध्ये येतात. या निकषांत बसणा-या सर्व कारवरील उत्पादन शुल्क 27 टक्क्यांवरून 30 टक्के करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चरर्स (सिअॅम) कडून यासंदर्भात वित्त मंत्रालयाने माहिती मागवली आहे.
यासंदर्भात सिअॅमचे संचालक विष्णू माथूर यांनी सांगितले, वाहन क्षेत्राने आपली भूमिका वित्त मंत्रालयाकडे मांडली आहे. मात्र, अद्याप त्यावर काही निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील नव्या तरतुदीमुळे काही सेडान श्रेणीच्या कार एसयूव्ही श्रेणीत आल्या आहेत. तसेच, काही स्वस्त वाहनेही या श्रेणीत आली आहेत. याउलट केवळ मोठ्या आणि जास्त किमतीच्या वाहनांवरच अतिरिक्त कर लादण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे ही तरतूद बदलून केवळ 12 लाखांपेक्षा जास्त किंमत असणा-या वाहनांवरच वाढीव शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.
बदलाची तयारी
केंद्रीय अर्थसंकल्पात एसयूव्हीवरील उत्पादन शुल्क 27 टक्क्यांवरून 30 टक्के केले आहे. त्यात बदल करण्याची तयारी सुरू आहे.
कोणत्या कार स्वस्त होणार
बजेटमधील तरतुदीत जर बदल झाला तर बोलेरो, स्कॉर्पिओ, झायलो, सफारीचे काही मॉडेल्स, सुमो, तवेरा आणि इनोव्हाच्या काही मॉडेल्सची उत्पादन शुल्कवाढीतून सुटका होईल.
नवा प्रस्ताव
ज्या एसयूव्हीची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे व ग्राउंड क्लिअरन्स 200 एमएम पेक्षा जास्त आहे अशा एसयूव्हींवरच 3 टक्के उत्पादन शुल्कवाढ लागू होईल.
ज्या एसयूव्हींची लांबी चार मीटरपेक्षा जास्त आहे, अशा एसयूव्हीवर शुल्कवाढ लागू होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.