आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sweet Ending Of Finacial Year , Booming In Share Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वित्तीय वर्षाचा शेवट गोड, शेअर बाजारात तेजीची चाहूल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - धूलिवंदन, गुड फ्रायडे अशा लागून सुट्या आल्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सप्ताहात मुंबई आणि राष्‍ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज फक्त दोन दिवस झाले. त्यामुळे अगोदरच्या दोन आठवड्यांमधील घसरणीमुळे चार महिन्यांच्या नीचांकी पातळीतून बाहेर पडत एस अ‍ॅँड पी बीएसई सेन्सेक्स आणि सीएनएक्स निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी चालू वित्तीय वर्षाचा शेवट मात्र सकारात्मक पातळीवर बंद होऊन केला.


आर्थिक अडचणीच्या भोव-यात अडकलेल्या सायप्रस देशाला आर्थिक मदतीचा हात मिळाल्यामुळे भांडवल बाजारात वातावरण बदलले. परिणामी आठवड्याच्या प्रारंभीच सेन्सेक्सने 18,950.22 अंकांची कमाल पातळी गाठली. परंतु ती फार काळ तग धरू शकली नाही. अगोदरच्याच आठवड्यात द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे बाजाराला मोठा धक्का बसून सेन्सेक्सची घसरगुंडी झाली होती. द्रमुकपाठोपाठ समाजवादी पक्षदेखील केंद्रातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या विचारात असल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. केंद्रात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यास त्याचा आर्थिक सुधारणांवर विपरीत परिणाम होण्याची भीती बाजाराला वाटत आहे.


राजकीय घडामोडींबरोबरच चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत सर्वोच्च पातळीवर गेलेली चालू खात्यातील तूट आणि महागाईचे चढे प्रमाण या दोन गोष्टी लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने नजीकच्या काळात व्याजदर कमी करण्यासाठी फारच मर्यादा असल्याचे संकेत दिल्यामुळे त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.


सायप्रस आणि त्याच्या युरोझोनमधील भागीदार देशांना दिवाळखोरीतून वाचवण्याबरोबरच ते एकच चलन गटात राहावे या दृष्टीने या देशांसाठी 13 अब्ज डॉलरच्या आर्थिक साह्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सोमवारी बाजाराने चांगली उसळी घेतली. डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत 28 मार्चला संपण्याअगोदर गुंतवणूकदारांनी केलेल्या ‘शॉर्ट कव्हरिंग’ मुळे मंगळवारी बाजाराने गेल्या सात दिवसांची घसरण भरून काढली. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर आपले व्यवहार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आठवड्याच्या शेवटी समभागांच्या किमतीत चांगली सुधारणा झाली.


आठवड्याच्या शेवटच्या दोन सत्रांत कमाई होऊनदेखील मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने
गुरुवारी 18,568.43 अंकांची गेल्या चार महिन्यांची नवीन नीचांकी पातळी गाठली.


साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स शुक्रवारी 100.17 अंकांनी वाढून 18,835.77 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याअगोदरच्या सप्ताहात मात्र सेन्सेक्सने 691.96 अंकांच्या मोठ्या घसरणीची नोंद केली होती. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2012 - 13 या आर्थिक वर्षात सेन्सेक्सने 1,431.57 अंकांची कमाई केली. राष्‍ट्रीय
शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही शुक्रवारी 31.20 अंकांची वाढ होऊन तो 5682.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


बाजाराला चिंता चालू खात्यातील तुटीची
मध्यावधी निवडणुकांची संभाव्य टांगती तलवार, आर्थिक सुधारणांची पुढची मार्गक्रमणा या सर्व गोष्टींबरोबरच बाजाराला चालू खात्यातील फुगलेल्या तुटीच्या चिंतेने ग्रासले आहे. त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता बाजारातील विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.