आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मेटालिक्स होणार टाटा स्टीलमध्ये विलीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलाद उत्पादनात आघाडीवर असलेल्या टाटा स्टील कंपनीने लोह आणि खनिज उत्पादनात कार्यरत असलेली टाटा मेटालिक्स ही कंपनी स्वत:मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याच जोडीला टाटा मेटालिक्सची पूर्णत: उपकंपनी असलेली टाटा मेटालिक्स कुबोटा पाइप्स लिमिटेड ही कंपनीदेखील टाटा स्टीलमध्ये विलीन करण्यात येणार आहे.

टाटा मेटालिक्स लिमिटेड आणि टाटा मेटालिक्स कुबोटा पाइप्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचे समिती संचालक आणि संचालक मंडळाने या विलिनीकरणाला मंजुरी दिली असल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे.

दोन्ही कंपन्यांनी विलनीकरणाचा निर्णय बुधवारीच घेतला असून भागधारक, कर्जदारांकडून तसेच अन्य नियामक मंजुरी मिळणे बाकी असल्याचे टाटा मेटालिक्सने मुंबई शेअर बाजाराला स्वतंत्ररीत्या कळवले आहे. टाटा मेटालिक्स लिमिटेड आणि टाटा स्टील लिमिटेडच्या एकत्रीकरणाची योजना एक एप्रिलपासून अमलात येणार आहे.

टाटा स्टीलचे चार शेअर्स मिळणार
टाटा मेटालिक्स ही कंपनी टाटा स्टीलमध्ये एकत्रित करण्याबरोबरच ती कंपनी गुंडाळण्याऐवजी टाटा स्टीलमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. या विलिनीकरण योजनेत टाटा मेटालिक्स लिमिटेडच्या भागधारकांना कंपनीच्या प्रत्येकी 10 रुपये मूल्याच्या प्रत्येक 29 समभागांसाठी टाटा स्टील लिमिटेडचे प्रत्येकी 10 रुपये मूल्याचे चार समभाग मिळणार आहेत. टाटा मेटालिक्समध्ये टाटा स्टीलचे सध्या 50.09 टक्के भागभांडवल आहे. एसआर बाटलबॉय अ‍ॅँड कंपनी एलएलपी आणि हरिभक्ती अ‍ॅँड कंपनी हे स्वतंत्र लेखापाल विलिनीकरणासाठी मूल्यांकन अहवाल तयार करणार आहेत.