आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टाटा’ वाहने दिवाळीपूर्वी महागणार, विक्रीच्या घसरणीवर किंमतवाढीचा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून विक्रीने सतत घसरणीचा सूर लावलेला असतानाही वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने दिवाळीपूर्वी आपल्या मोटारींच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
सध्या सर्वच मोटार कंपन्यांना वाहन उद्योगातील मंदीच्या झळा बसत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे जून महिन्यात सलग आठव्या महिन्यात मोटारींची विक्री 9 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातील 1,53,450 मोटारींवरून 1,39,632 वाहनांवर आली.

मोटार कंपन्यांमध्ये मारुतीची मोटार विक्री याच महिन्यात 8.17 टक्क्यांनी घसरली, तर ह्युंदाईच्या विक्रीत थोडीफार वाढ झाली; परंतु टाटा मोटर्सच्या विक्रीत मात्र 29.17 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातील याच महिन्यातील 13,595 मोटारींवरून 9,628 मोटारींवर आली. एप्रिलपासून आतापर्यंत टाटा मोटर्सने विक्री वाढीची शिडी सर केलेली नसून ही घसरण सरासरी 35 टक्के झाली आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कंपनीच्या प्रवासी वाहन व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुश अरोरा यांनी सांगितले; परंतु प्रस्तावित किंमतवाढीचे स्वरूप काय असेल हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.
‘होरायझननेक्स्ट’ या आपल्या धोरणाला अनुसरून नवीन ग्राहक सेवा उपक्रमाची घोषणा करताना ते बोलत होते.


घरपोच सेवा
या नवीन उपक्रमांतर्गत ग्राहकांना तत्काळ सेवा देण्यासाठी कंपनीने घरपोच सेवा देणारी डोअरस्टेप व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात आणखी किमान 20 डोअरस्टेप व्हॅन सुरू करण्याची टाटा मोटर्सची योजना आहे. ग्राहकांना आपल्या पसंतीचा वितरक, कालावधी व दिवस निवडता यावा यासाठी कंपनीने वाहनांच्या सर्व्हिसिंगकरिता ऑनलाइन सेवादेखील सुरू केली आहे. याशिवाय अन्य अनेक नवीन सेवा कंपनीने सुरू केल्या आहेत.