आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Now Consantrate On Hybrid, Electrical Vehicles

टाटाची नजर आता हायब्रीड, इलेक्ट्रिक वाहनांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारात सध्या आलेल्या मंदीच्या लाटेची तमा न बाळगता टाटा मोटर्सने आता भविष्यातील गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील सात वर्षांमध्ये पर्यायी इंधनाबरोबरच हायब्रीड आणि इलेक्ट्रॉनिक वाहने बाजारात आणण्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल सुरू असल्याचे संकेत टाटा मोटर्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी दिले आहेत.

टाटा मोटर्स काही नवीन उत्पादने 2020 पर्यंत बाजारात आणण्याची योजना आखत असून त्यामध्ये पर्यायी इंधन, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा प्रामुख्याने समावेश असेल, असे मिस्त्री यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.

टाटा मोटर्सने ताब्यात घेतलेल्या ब्रिटनमधील जॅग्वार लॅँड रोव्हरने भारताबरोबरच ब्राझील आणि सौदी अरेबिया या उगवत्या बाजारपेठांमध्ये पंख पसरण्याच्या संधी शोधतानाच यंदा आठ नवीन किंवा चेहरामोहरा बदललेली वाहने बाजारात आणण्याची योजना आहे. आगामी सात वर्षांमध्ये ही वाहने बाजारात आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
‘होरायझन नेक्स्ट’वर भर

उत्पादनावर लक्ष केंद्रित करतानाच उच्च दर्जा आणि निर्मिती, भक्कम विक्री पश्चात सेवा आदींच्या आधारावर ‘होरायझननेक्स्ट’ या नव्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर नवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी टाटा मोटर्स सज्ज झाली आहे. एस आणि मॅजिक या दोन्ही मिनीट्रक्सची विक्री एक दशलक्षपेक्षा जास्त झाली आहे. विशेष म्हणजे ही उत्पादने सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा बाजारात आणण्यात आली. स्पर्धात्मक किमतीमुळे मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेतील हिस्सा कमी झाल्यामुळे आता हलक्या व्यावसायिक वाहनांच्या बाजारातील हिस्सा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वार्षिक अहवालात म्हटले आहे.